कपिल देव एकमेव, हार्दिकची तुलना नको: सुनील गावस्कर

नवी दिल्ली, दि. 7 – कपिल देव आणि हार्दिक पांड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. कपिल देवसारखा महान अष्टपैलू खेळाडू शतकात एकदाच जन्माला येतो आणि त्याची तुलना कोणाशीही होऊच शकत नाही, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले. गावस्कर म्हणाले की, कपिल देवची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. कपिलसारखा खेळाडू एका पिढीतच नव्हे, तर शतकात एकदाच घडू शकतो. अगदी सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच.

काही दिवसांपासून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची तुलना कपिल देवशी करण्यात येत आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर हार्दिक पांड्या हा भावी कपिल देव असल्याचे म्हटले गेले होते. याबाबत गावस्कर यांना विचारण्यात आले असता ही तुलना योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, गावस्कर यांनी भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कामगिरीवर नाराजी व्यक्‍त केली. धवनने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 26 व 13 धावा केल्या. ते म्हणाले, शिखरला आपल्या खेळात सुधारणा करायची नाही. वन-डे आणि कसोटीत फरक आहे. वन-डेत जसे फटके मारून धावा मिळतात तसे फटके कसोटीत मारून चालत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे कसोटीसाठी आपल्या खेळात बदल करणे गरजेचे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्लिपमध्ये जास्त किंवा सातत्याने क्षेत्ररक्षक ठेवले जात नाहीत. त्यामुळे त्या दिशेने मारलेला फटका चौकार किंवा धावा मिळवून देऊ शकतो. मात्र कसोटी सामन्यांमध्ये त्या दिशेने मारलेला फटका तुम्हाला बाद करू शकतो. त्यामुळे धवनला त्याच्या शैलीत बदल करायचा नसल्यास त्याला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरेल, असे सांगतानाच दुसऱ्या कसोटीत भारताने एक अतिरिक्‍त फलंदाज खेळविण्याचा आणि जादा फलंदाज म्हणून चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देण्याचा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. गावस्कर म्हणाले की, खेळपट्टीवर गवत असेल तर उमेश यादवला वगळून हार्दिक पांड्याबरोबरच पुजारालाही संघात स्थान मिळाले पाहिजे.

दुसऱ्या कसोटीत लॉर्डस मैदानावर नाणेफेक जिंकल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी घ्यावी असेही त्यांनी सुचवले आहे. सध्याचे अनेक संघ चौथ्या डावांत 200 धावांच्या आसपास लक्ष्याचा पाठलाग करतानाही कोसळत आहेत. पहिल्या कसोटीत भारताच्या जागी इंग्लंडचा संघ असता तरी त्यांचीही कदाचित अशीच अवस्था झाली असती, असे गावस्कर यांनी सांगितले. सध्याच्या खेळाडूंना सल्ला नको सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू हे माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी येत नाहीत.

पूर्वी सचिन, द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण हे खेळाडू दौऱ्यावर असताना माझ्याशी नेहमी चर्चा करीत असत, तसेच वेळोवेळी माझ्याशी सल्लामसलत करत. पण सध्याची पिढी वेगळी आहे. त्यांना फलंदाजी, गोलंदाजी यात मार्गदर्शन करण्यासाठी निरनिराळे प्रशिक्षक असतात. त्यामुळे कदाचित त्यांना माझ्याकडे येणे तितकेसे गरजेचे वाटत नसावे. केवळ मुंबईकर अजिंक्‍य रहाणे कधी कधी माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येतो, असे सांगून गावस्कर म्हणाले की, आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज वाटत नसणे हे काही चांगले लक्षण नव्हे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)