कणसेवाडी ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराचा आरोप

चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे बेमुदत उपोषण

वडूज – कणसेवाडी, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या मागील एका सरपंच व ग्रामसेवकाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी विद्यमान सदस्य संतोष किसन जाधव यांनी गावातील हनुमान मंदिरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कणसेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 2015 ते सन 2017-18 कालावधीत चौदावा वित्त आयोग व अन्य योजनांतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे दाखवली आहेत. यापैकी रस्ता मुरमीकरण, नळ पाणी पुरवठा योजना व दुरुस्ती, शाळा पटांगण सपाटीकरण, एल.ई.डी. बल्ब खरेदी करणे, अंगणवाडी डिजीटल करणे, वृक्ष लागवड करणे, स्वच्छता मोहिम, जलयुक्त शिवार योजनेमधून पाझर तलावातील गाळ काढणे, स्ट्रीटलाईटवर बल्ब बसवणे आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, शेकडो ग्रामस्थांनी उपोषणास पाठींबा दिला असून डॉ. दिलीप येळगांवकर, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, गटविकास अधिकारी, उपअभियंता निलेश डेरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. उपोषणासंदर्भात पोलीस व आरोग्य विभागाने फारसे गांभीर्याने घेतले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. उपोषणस्थळी पोलीस अथवा आरोग्य विभागाचा प्रतिनिधी फिरकला नाही. पोलीस यंत्रणा नसल्यामुळे उपोषणस्थळी मध्यपींचा आरडा-ओरडा सुरू आहे. प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अन्यथा या आंदोलनात सर्व ग्रामस्थ उतरतील असा इशारा शिंदे व लवळे यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)