कल्याण – कल्याणमध्ये विवाहितेची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दुपारच्या सुमारास घडला. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सनम करोतिया असे हल्ला करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सनम करोतिया दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये स्कूटरवरून येत होत्या. त्या दुचाकी लावत असतानाच त्यांच्या मागे बाईकवरुन दोघे जण आले. त्यापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने सनम यांच्यावर चाकूने वार करत घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनम यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तासाभरातच सनम करोतिया यांच्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बाबू ढकणी याला बेड्या ठोकल्या. हा हल्ला नेमका का करण्यात आला, हे अजूनही समोर आलेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.