दोघा समर्थकांत हाणामारी; भाजपांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
पाथर्डी – भाजपमधे काम करत असलेल्या दोन तरुण कार्यकर्त्यांमध्ये आज खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोरच मारामारी झाल्याने विखे यांच्या खासदार झाल्यानंतरच्या तालुक्यातील पहिल्याच दौऱ्याला गालबोट लागून भाजपांतर्गत वाद विकोपाला गेला असल्याचे मानले जात आहे. आज सकाळी डॉ. सुजय विखे हे माजी आमदार स्व. दगडू पाटील बडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी तालुक्यातील चिचंपुर पांगुळ येथे आले होते.
हा कार्यक्रम झाल्या नंतर प्रदेश पातळीवर काम करत असलेल्या एका भाजप युवा नेत्याने विखे यांनी आपल्या घरी चहाला या असे निमंत्रण दिले. मात्र त्याच वेळी विखे समर्थक असलेल्या एका भाजप कार्यकर्त्याने विखे यांना पुढे चला असे म्हटल्यावरून या दोन्हीही युवकांमध्ये वाद झाला व त्यात प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या युवा नेत्याने विखे समर्थक तरुण नेत्याच्या श्रीमुखात भडकावली.
यावेळी त्या ठिकाणी अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या वादावर पडदा टाकला मात्र त्यानंतर आज सायंकाळी प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या नेत्याच्या पाथर्डी येथील दुकानात ज्याला मारहाण झाली होती तो नेता व त्याचे समर्थक आले व त्यांनी श्रीमुखात भडकावणाऱ्या नेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका माजी जिल्हा परिषद सदस्याने त्या ठिकाणी जमलेला जमाव हटवल्याने काहीही अनर्थ घडला नाही. या संदर्भात पोलीस स्टेशनला सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद मात्र करण्यात आली नव्हती. या घटनेनंतर पाथर्डी शहरासह परिसरातून सोशल मीडियावर या घटनेची मात्र उलट सुलट चर्चा चालू होती.