‘ऊत्कर्ष क्रीडा संस्था’ व ‘महाराष्ट्र कबड्डी’ संघ अंतीम फेरीत दाखल

राजमाता जिजाऊ संघाच्या स्नेहल साळुंकेची पकड करण्याचा प्रयत्न करताना शिव ओम संघाच्या पायल वसवे व तृप्ती दुर्गे.

आमदार चषक ‘ मॅटवरील कबड्डी स्पर्धा

पुणे – पुरूष विभागात उत्कर्ष क्रीडा संस्था व महाराष्ट्र कबड्डी संघ रहाटणी आणि महिला विभागात राजमाता जिजाऊ व जागृती प्रतिष्ठान या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना भोसरी येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर कै. प्रमोद कुलकर्णी क्रीडानगरीत आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ कबड्डी संघ आयोजित “आमदार चषक’ मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

यावेळी पुरूष विभागातील उपांत्यफेरीतील पहिला सामना उत्कर्ष क्रीडा संस्था व चेतक स्पोर्टस्‌ बालेवाडी यांच्यात खेळला गेला. या सामन्यात उत्कर्ष क्रीडा संघाने चेतक स्पोर्टस्‌ संघाचा 39-10 असा धुव्वा उडवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. यावेळी, मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा संघाकडे 18-6 अशी आघाडी होती.

उत्कर्ष क्रीडा संस्थेच्या गणेश कांबळे याने अष्टपैलू खेळ केला तर चेतन पारधे याच्या चढाया आणि शुभम गायकवाड याने केलेल्या पकडींच्या जोरावर हा सामना सहज जिंकला. मध्यंतरापुर्वीच उत्कर्ष संघाने आक्रमक धोरण स्विकारल्याने चेतक स्पोर्टस्‌ संघाचा बचाव खिळखिला केला. या धक्क्‌यातून चेतक संघ शेवट पर्यंत बाहेर पडलाच नाही. चेतक स्पोर्टस्‌ संघाच्या शुभम शिंदे व महेश बालवडकर व संकेत बालवडकर यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

तर, दुसरा उपांत्य सामन्यात महाराष्ट्र कबड्डी संघ रहाटणी व युवक क्रीडा संस्था यांच्यात खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्र कबड्डी संघ रहाटणी ने युवक क्रीडा संस्थाचा 39-17 असा एकतर्फी पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला महाराष्ट्र कबड्डी संघाकडे 15-9 अशी आघाडी होती.

महाराष्ट्र कबड्डी संघाच्या दिपक गिरी व चेतन थोरात यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. यामध्ये दिपक गिरी याने एकदा एका चढाई मध्ये चार खेळाडू टिपत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांना अक्षय नखाते याने उत्कृष्ट पकडी घेत चांगली साथ दिली. युवक क्रीडा मंडळाच्या तुषार चव्हाण व जितेंद्र काळे यांनी उत्कृष्ट चढाया करीत चांगला खेळ केला. त्यांना विजय मारणे याने काही पकडी घेत चांगली साथ दिली.

तर, महिला विभागात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीचा पहिला सामना राजमाता जिजाऊ संघ व शिव ओम संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने शिवओम संघावर 44-19 अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे 18-10 अशी आघाडी होती. राजमाता जिजाऊ संघाच्या स्नेहल शिंदे, सायली केरीपाळे यांच्या चौफेर चढायांमुळे मध्यंतरापुर्वी चांगली आघाडी घेतली. त्यांना अंकिता जगताप हिने उत्कृष्ट पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

शिव ओम संघाच्या स्नेहा साळुंके हिने उत्कृष्ठ चढाया केल्या तर पायल वसवे व सोनाली साळुंके यांनी घेतलेल्या पकडींमुळे सामन्यांच काही काळ रंगत भरली होती. मात्र मध्यंतरापुर्वी राजमाता संघाने लावलेला लोनची परत फेड न करता आल्याने त्यांचे मनोधैर्य खचले व हा सामना एकतर्फी झाला.

तर, दुसरा सामना जागृती प्रतिष्ठान व ओम साई वडगाव शेरी यांच्यात खेळला गेला. हा सामना जागृती प्रतिष्ठान या संघाने 33-28 असा जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांची अंतिम फेरीत राजमाता जिजाऊ संघाशी गाठ पडेल. या सामन्यात मध्यंतराला जागृती प्रतिष्ठान संघाकडे 19-15 अशी आघाडी होती.

जागृती प्रतिष्ठानच्या ऋतिका होनमाने, जागृती सुरवसे यांच्या खोलवर चढाया करीत आपल्या संघाला मध्यंतरापुर्वी आघाडी मिळवून दिली. तीला अंजली मुळे व प्राजक्ता जाधव यांनी चांगल्या पकडी घेतल्या. ओम साई वडगाव शेरी संघाच्या आफरिन शेख व आम्रपाली गलांडे यांनी खोलवर चढाया करीत चांगली लढत दिली. त्यांना अंकिता चव्हाण हिच्या पकडींही साथ मिळाली. मात्र त्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)