नुसता तोंडदेखलेपणा काय कामाचा? (अग्रलेख)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधांवर उपाय म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, “आम्हाला एक संधी द्या; हल्लेखोरांचे ठोस पुरावे द्या; आम्ही धडक कारवाई करू,’ अशी ग्वाही दिली आहे. त्यांच्या आवाहनात सकृतदर्शनी प्रामाणिकपणा दिसत असला तरी ते ज्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्या देशाची पार्श्‍वभूमी मात्र विश्‍वास ठेवावा अशी नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या आवाहनाला प्रतिसाद कसा द्यायचा, हा भारतापुढील प्रश्‍न आहे. या आधीही 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी भारताने पाकिस्तानला सबळ पुरावे दिले होते. पण त्यावर कुठे ठोस कारवाई झाली? हाच अनुभव उरीमध्ये हवाईतळावर झालेल्या हल्ल्याच्या संबंधातही आला. तेथे पाकिस्तानच्या विनंतीनुसार, त्यांच्या तपासयंत्रणेला भारतात येऊन तपास करू देण्याची अनुमती देण्यात आली. त्यानंतर भारताचेही एक शिष्टमंडळ पाकिस्तानला तपासासाठी पाठवण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यांचे शिष्टमंडळ येथे येऊन गेले; पण भारताच्या शिष्टमंडळाला मात्र तेथे भेट देण्यासाठी अनुमती पाकिस्तानकडून मिळाली नव्हती. हा प्रकार अगदी अलीकडचा आहे. या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानवर कोणत्याही परिस्थितीत विश्‍वास ठेवता येत नाही.

आता पाकिस्तानातील सरकार नवीन आहे. इम्रान खान यांची पाटी कोरी आहे. त्यांच्यावर एकदम अविश्‍वास दाखवता येत नसला तरी ते म्हणतात, त्याप्रमाणे त्यांना एक संधीही देण्यास हरकत नसावी; पण त्या आधी त्यांनीही भारताचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही तरी ठोस कृती करणे गरजेचे आहे. पुलवामा येथील हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद ही संघटना जबाबदार आहे आणि त्या संघटनेने याची अधिकृतपणे जबाबदारीही स्वीकारली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानात आश्रयाला असलेला जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसुद अझरवर पाकिस्तानने कारवाई करायला हवी होती. पण त्यासाठीही त्यांना पुरावे हवे आहेत. हे मात्र न पटण्यासारखे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मसुद अझरची पार्श्‍वभूमी कोणा सभ्य माणसाची पार्श्‍वभूमी नाही. त्यामुळे भारताकडून पुरावे येण्याची वाट पाहण्याआधीच त्यांनी त्याच्यावर कारवाई सुरू करायला काय अडचण होती; किंवा कोणाच्या परवानगीची गरज होती, याचे उत्तर मात्र इम्रान खान यांनी दिलेले नाही. तसे झाले असते तर भारताला पाकिस्तानच्या नव्या राजवटीविषयी थोडा तरी विश्‍वास वाटला असता. अशी कोणतीही ठोस कृती न करता जर इम्रान खान भारताकडे आणखी एक संधी मागत असतील तर तो केवळ एक तोंडपूजेपणा ठरतो. एकीकडे भारतावर “युद्धखोरीच्या मानसिकतेचा’ आरोप करायचा आणि दुसरीकडे कारवाईसाठी पुरावे मागायचे, असली नाटके आता भारत सहन करण्याच्या परिस्थितीत नाही. भारताच्या बाबतीत आता अणुबॉम्ब वापराचीही भाषा आडून-आडून वापरली जाऊ लागली आहे. पण त्यांच्या या भाषेला त्यांच्याच देशाचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी परस्पर उत्तर दिले आहे.

आजच त्यांनी दुबईतील एका पत्रकार परिषदेत नमूद केले आहे की, “भारतावर पाकिस्तानने एक जरी अणुबॉम्ब टाकला तर भारत आज पाकिस्तानवर 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान बेचिराख करू शकतो. ही परिस्थिती टाळायची असेल तर पाकिस्तानला सुरुवातीलाच 50 बॉम्ब भारतावर टाकावे लागतील तरच भारत 20 बॉम्ब टाकण्याच्या स्थितीत राहणार नाही.’ इतकी क्षमता पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे आडूनआडून अणुबॉम्ब वापराची पाकिस्तानची भाषा त्यांच्याच अंगलट येण्यासारखी स्थिती आहे. आज जर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असेल, तर त्याला केवळ आणि केवळ पाकिस्तानच जबबादार असून ही स्थिती टाळणेही त्यांच्यात हातात आहे. वर नमूद केल्यानुसार पाकिस्ताननेच आता आंतरराष्ट्रीय समुदायाचा रोख लक्षात घेऊन आपल्याच देशातील दहशतवादाची पाळेमुळे खणून काढण्याची मोहीम त्वरित हाती घेतली पाहिजे. या दहशतवाद्यांचा केवळ भारतालाच नव्हे तर खुद्द त्यांच्याही देशाला नेहमीच त्रास होतो आहे. त्यामुळे आता भारताचा विश्‍वास संपादन करायचा इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकून निदान सुरुवातीच्या टप्प्यात मसुद अझरच्या मुसक्‍या बांधायला हव्यात.

युद्ध हा परवडणारा उपाय नाही याची खात्री त्यांनाही पटली आहे. आजच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भिकेला लागला आहे. उद्याचे युद्ध त्यांना पार रसातळाला घेऊन जाईल. इम्रान खान हे बहुधा जाणून असावेत म्हणूनच आज ते “आम्हाला आणखी एक संधी द्या,’ म्हणून भारताला विनवताना दिसत आहेत. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. युद्धाची खुमखुमी भारतालाही नाही. पण भारताने किती सहन करायचे, यालाही काही मर्यादा आहेत. भारताची ही अडचण इम्रान खान यांनी लक्षात घ्यायला हवी. इम्रान खान यांनी आज जे आवाहन केले आहे, त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यांची भूमिका स्पष्ट केली असून त्यांचे हे आवाहन भारताने धुडकावून लावले आहे.

पाकिस्तानची भूमिका प्रामाणिकपणाची नाही, हेच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ठोसपणे निदर्शनाला आणून दिले आहे. मुद्दा केवळ पाकिस्तानच्या प्रामाणिकपणाचा आहे. तो जोपर्यंत ठळकपणे समोर येत नाही, तोपर्यंत इम्रान खान यांच्या या विनवणीला किंवा आवाहनाला किंमत नाही. एखाद्या देशाने एकाच वेळी 40 सैनिक गमावल्यानंतरही त्यांना थातूरमातूर वक्‍तव्ये करून शांत करता येणार नाही. इम्रान खान यांच्या लष्करी सल्लागारांनीही त्यांना हेच सांगितले असेल. त्यांनी तो सल्ला मानावा आणि मसुद अझरसह सर्व दहशतवादी म्होरक्‍यांचा त्यांनी बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घ्यावी. तरच युद्धाचा संभाव्य धोका टळू शकेल. अन्यथा पाकिस्तानची काही धडगत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)