आपत्ती व्यवस्थापनाच्या केवळ गप्पा

साताऱ्यातील 76 इमारती या धोकादायक ठरवल्या गेल्या तरी बहुतांश इमारती उतरवून घेण्याची जबाबदारी जागा मालकांनी पार पाडली नाही. माची पेठेत एका घराच्या पायाचा भरावच वाहून गेल्याने सर्व दगडी रस्त्यावर आली आहेत. सदाशिव पेठेत जुन्या मटण मार्केटच्या पिछाडीला असणारी भिंत पडून ओढ्यात वाहून गेली. लंब्याच्या बोळात ओढ्याला पाणी वाढल्याने सगळी घाणं सेवारस्त्यावर आली आहे.

जे रस्ते 50 वर्षांपूर्वी होते, तेच रस्ते आताही आहेत. त्या रस्त्यांचे रुंदीकरणही अद्याप झालेले नाही. त्यात गेल्या 15 वर्षांमध्ये चारचाकी व दुचाकींची संख्याही वारेमाप वाढली. परंतु रस्ते मात्र “जैसे थे’च राहिल्याने सातारच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेने ग्रेड सेप्रेटरची पाहणी केली. त्यावेळी पोवई नाका ते शाहू चौक या दरम्यान सेवा रस्त्यावर मुरूम टाकण्याचे आश्‍वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र चिखलाने या रस्त्यावर पूर्ण दलदल झाली आहे. गम्मत जम्मत वाइन शॉप, बारटक्के कॉर्नर, गवंडी बोळ, ढोणे कॉलनी, धस कॉलनी, पंताचा गोट, माजगावकर माळ येथे उखडलेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आल्याचा फायदा तर झाला नाहीच उलट पावसाने दलदलच झाल्याने वाहने घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात पोलिसांच्या एकेरी वाहतुकीमुळे भर पडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परवा कूपर कॉलनीतील सातारा-लोणंद रस्त्यावरील कण्हेर कालव्यावरील पुलाचा मुख्य पायाच खचल्याने सातारा, लोणंद, फलटण व पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. ही वाहतूक रिमांड होम, सदर बझारमार्गे वाढे फाट्याकडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या छोट्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याठिकाणी वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी नसल्यामुळे वाहनधारकांवर कोणताही निर्बंध राहिलेला नाही.

जिल्ह्यातून साताऱ्यात प्रशासकीय व इतर कामांसाठी येणाऱ्या लोकांनी साताऱ्याकडे पाठ फिरवली आहे, तसेच ठोसेघर व कास येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सातारा नको रे बाबा, असे म्हणत साताऱ्याकडे पाठ फिरवली आहे. सातारा शहरात परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा बसेसवरील चालक नव्याने सुरु करण्यात आलेल्या मार्गांमुळे गांगरुन गेले आहेत. सातारा मध्यवर्ती बसस्थानकास जायचे कसे हे स्थानिकांना विचारुन मेटाकुटीस आलेले आहेत.

पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे सुरु असलेले काम, कूपर कॉलनीतील कालव्यावरील खचलेला पूल आणि भरीस भर म्हणून सातारा शहरातील रस्त्यांवर पडलेल्या गुडघ्याएवढील खोल खड्ड्यांमुळे सातारकरांची दैना झालेली आहे. उशिरा आलेल्या मान्सूननेही आपला निर्दयीपणा सातारच्या रस्त्यांवर दाखवायला सुरुवात केलेली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा नगरपालिका प्रशासनाच्या खाबुगिरीची जबर किंमत मात्र सामान्य सातारकरांना मोजावी लागत आहे. साताऱ्यातील रस्त्यांची डागडुजी चांगल्याप्रकारे करण्याची मागणी साताऱ्यातील त्रस्त वाहनचालक व ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)