जुन्नर – जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याच्या निषेधार्थ जुन्नर शहरातील शिवसेनेचे काही पदाधिकारी, शहरप्रमुख व शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्नरमधील शासकीय विश्रामगृहामध्ये मंगळवारी (दि. 9) झालेल्या बैठकीमध्ये शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी जुन्नर शहर प्रमुख शिवदर्शन खत्री, संघटक कुलदीप वाव्हळ, ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष शैलेश बनकर, विभाग प्रमुख पुष्कराज जंगम, चंद्रकांत सोनवणे, सुजित परदेशी, मुकेश परदेशी, मंगेश साळवे, अतुल काशीद, अनिल पुंडे, सम्राट कर्पे, चंद्रकांत फलके, रोहन करडिले, शंकर जनानी, कुतुब शेख, राहुल पुरवंत आदींसह शिवसैनिकांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेनेकडून आशा बुचके याच्यावर झालेली कारवाई या पदाधिकाऱ्यांना मान्य नसून, पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम बुचके यांनी केल्याचे त्यांचे मत आहे, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी भविष्यात त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे जुन्नरची राजकीय समिकरणे बदलणार आहेत.