रहदारीच्या मार्गावरील वेशी धोकादायक
तातडीने दुरुस्तीची मागणी
हितेंद्र गांधी
जुन्नर – जुन्नर शहराच्या पूर्वेला जुन्या बस स्थानकाजवळ चार वर्षांपूर्वी सुमारे कोटभर रुपये खर्चून दगडी बांधकाम असलेली भव्य वेस उभारण्यात आली होती. जुन्नर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक धाटणीतील प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाईही करण्यात आली. मात्र, या वेशीच्या वरील भागांतून सतत पाणी टपकत असल्यामुळे या वेशीच्या कामाच्या दर्जाबाबतच नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी या वेशीवरील दगड पडल्याची घटना घडली असून, सुदैवाने कोणासही इजा झाली नव्हती. मागील पावसाळ्यातही या वेशीतून पाणी गळत होते, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी केल्याचे दिसून येत आहे. या वेशीच्या वरील भागांत पावसाळ्यात साचणारे पाणी जाण्यास मार्ग नसल्यामुळे हे पाणी छतावर साचून राहते. हेच साचलेले पाणी कमकुवत स्लॅबमधून भिंतींमध्ये झिरपते आणि यामुळे बांधकामाचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. या वेशीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक अविनाश कर्डिले यांनी केली आहे.
शासकीय कार्यालयांची अवस्था दयनीय
शहराच्या मध्यवस्तीत शासकीय कार्यालये असलेल्या गढी परिसराच्या प्रवेशद्वाराची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हा परिसर दादोजी कोंडदेव नावानेही ओळखला जातो. निजामशाही राजवटीत जुन्नर हे महत्त्वाचे
शहर होते. येथील प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली असून, दगड-मातीच्या बांधकामातील हे प्रवेशद्वार पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या परिसरात पोस्ट ऑफिस, पोलीस ठाणे, तहसील कचेरी, सबरजिस्टर, वनविभाग आदी अनेक शासकीय इमारती असून, याच ढासळलेल्या प्रवेशद्वारातून नागरिकांची ये-जा सुरू असते. या ऐतिहासिक कमानीची व बुरुंजाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष हरीश भवाळकर यांनी केली आहे.
सदाबझार पेठेतील कमानीची दुरवस्था
शहरातील सदाबझार पेठेत पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कमानीतून पाणी सतत झिरपत आहे. याठिकाणी शहरातील नागरिकांची व वाहनांची सतत रहदारी असून, या कमानीची दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी होत आहे. या ठिकाणची झुडपे काढून रंगरंगोटी करण्याची गरज असल्याचे मत ऍड. समीर पुरवंत यांनी व्यक्त केले आहे.