ज्युलियन ऍसांजला इंग्लंडच्या दूतावासातून अटक

इक्‍वेडोर सरकारने आश्रय नाकारला

स्कॉटलंड यार्डकडून अटक आणि लवकरच कोर्टात हजर करणार

लंडन – विकीलीक्‍सचा सहसंस्थापक ज्युलियन ऍसांज याला आज इंग्लंडमधील इक्‍वेडोरच्या दूतावासामधून अटक करण्यात आली, असा दावा स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी केला आहे. ऍसांज गेल्या 7 वर्षांपासून लंडनमधील इक्‍वेडोरच्या दूतावासामध्ये दडून बसला होता. मात्र तेथून त्याला बाहेर काढण्यात आले. इक्‍वेडोरने त्याला दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर त्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले.

ऍसांजविरोधात इंग्लंडमध्ये जामीनासाठीच्या अटींचा भंग केल्याच्या आरोपाखाली जून 2012 मध्ये वॉरंट काढण्यात आले होते. त्या वॉरंटच्या आधारेच त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

ऍसांजविरोधात स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर गेल्या 7 वर्षांपासून इक्‍वेडोरच्या दूतावासातील खोलीतच रहात होता. आपल्याला अमेरिकेच्या स्वाधीन केले जाईल, या भीतीपोटी त्याने इक्‍वेडोर सरकारकडे आश्रयाची याचना केली होती. अमेरिकेच्या गोपनीय बातम्या विकीलीक्‍सद्वारे उघड केल्यामुळे अमेरिकेमध्ये त्याला देहदंडाची शिक्षा किंवा छळाला सामोरे जावे लागेल, अशी शक्‍यताही त्याने वर्तवली होती.

ऍसांजला मध्य लंडनमधील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तेथून त्याला वेस्टमिन्स्टर मॅजिस्टेटच्या कोर्टात नेले जाईल, असे महानगर पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. ऍसांजने 2012 मध्ये कोर्टासमोर शरणागती स्वीकारण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्याने तसे केले नाही, त्यामुळे 29 जून 2012 रोजी त्याच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले होते. दरम्यान लैंगिक शोषणाचा स्वीडनमधील त्याच्या विरोधातील आरोप रद्द करण्यात आला आहे. इक्‍वेडोर सरकारने ऍसांजला आश्रय देण्याचे नाकारल्याचे लंडनमधील दूतावासाला कळवले होते. त्यानंतर ऍसांजला लंडनच्या दूतावासात नेण्यात आले आणि नंतर त्याला अटक करण्यात आली.

ऍसांजला अटक करण्यात आल्याचे इंग्लंड सरकारने स्वागत केले आहे. इंग्लंड आणि इक्‍वेडोर सरकार्मधील संवादामुळेच हे शक्‍य झाल्याचे सरकारने म्हटले आहे. तर ऍसांजने वारंवार आश्रयाच्या अटींचा भंग केल्यामुळेच त्याला दिलेली सुरक्षितता काढून घेतल्याचे इक्‍वेडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी म्हटले आहे.

तर इक्‍वेडोर सरकारच्या दूतावासात ऍसांजवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. त्याच्याला इंटरनेटचा वापरही मर्यादित स्वरुपात करू दिला जात असे. त्यामुळे इक्‍वेडोर सरकारकडून आपल्या स्वातंत्र्यच्या मूलभूत हक्काची पायमल्ली केल्याचा आरोप ऍसांजने केला आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये त्याने इक्‍वेडोरसरकारविरोधात एक खटलाही दाखल केला होता.
अमेरिकेकडून ऍसांजविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा एकही आरोप केल्याचे अधिकृतपणे मान्य केले नाही.

विकीलीक्‍सच्या माध्यमातून उघड झालेल्या केबल्सविरोधात जरी अमेरिकेने टीका केली असली, तरी ऍसांजविरोधात आरोप असल्याचे मान्य केले नाही. अमेरिकेच्या विरोधातले अनेक गोपनीय दस्ताऐवज विकीलीक्‍सकडून नजरचुकीने गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आले होते. तेंव्हापासूनच ऍसांजच्या प्रत्यार्पणाची भीती विकीलीक्‍सकडून व्यक्‍त होत होती.

ऍसांजला इक्‍वेडोरने 2017 च्या डिसेंबरमध्ये नागरिकत्व दिले होते. ऍसांजला रशियामधील उच्चपदावर नियुक्‍त करण्याच्या हालचालीही सुरू होत्या. मात्र जर तो इक्‍वेडोरच्या दूतावासातून बाहेर पडला, तर त्याला अटक केली जाईल, असे ब्रिटीश सरकारने स्पष्ट केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)