सरपंच निवडीसाठी महिलांची मते ठरणार निर्णायक

चाफळ – राजकियदृष्ट्या अतिसंवेदशीन समजल्या जाणाऱ्या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चाफळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत चांगलीच रंगत भरली आहे. आ. देसाईगट व पाटणकर गट आमनेसामने लढत असून या निवडणुकीतील महिला मतदारांची संख्या लक्षात घेता सरपंच निवडीसाठी महिलांचीच मते निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधारी आ. शंभूराज देसाई यांचे शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेल व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे ग्रामविकास पॅनेल मध्ये अटीतटीची निवडणुक होत आहे. दोन्ही गटाकडून प्रचार शिगेला पोहचला आहे. ही निवडणुक पाटणकर गटाचे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार यांच्यासाठी तर आ. देसाई गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, विजयसिंह पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे चाफळचा गड जिंकण्यासाठी दोन्ही गटाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळच्या निवडणुकीत देसाईगटामधून वार्ड नं 3 मधून उभे राहिलेले माजी सरपंच सुरेश काटे हे वगळता दोन्ही गटाकडून नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे.

सरपंचपद थेट जनतेतून निवडून द्यायचे असून आ. देसाई गटाकडून माजी सरपंच ज्येष्ठ समाजसेवक पुंडलीक पाटील (चाचा) यांचे चिरंजीव सूर्यकांत पाटील (आप्पा) तर पाटणकर गटाकडून आरोग्य विभागात प्रदीर्घ सेवा केलेले एल. एस. बाबर (भाऊ) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगला आहे. या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या 1350 तर महिला मतदारांची संख्या 1379 इतकी आहे.

महिला मतदारांची संख्या मोठी असल्याने महिला मतदारांपर्यत पोहचणे महत्वाचे आहे. महिलांच्या मतांवरच सरपंच निवडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकंदरीतच निवडणुक प्रचार अंतीम टप्प्यात पोहचला असून वैयक्तिक गाठीभेटीवर दोन्ही उमेदवारांनी जोर धरला आहे. आपलाच उमेदवार कसा योग्य हे मतदारांना पटवून देण्याचे काम कार्यकर्ते करु लागले आहेत. शेवटी या निवडणुकीत महिलांचीच मते निर्णायक ठरणार असल्यामुळे महिलांची मते मिळविण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या क्‍लुप्त्या सुरु केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)