लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यासाठी न्यायाधीशांना अज्ञात लोकांनी ब्लॅकमेल केले. तसेच त्यांच्यावर या प्रकरणी दबाव टाकला गेला, असे सांगणाऱ्या एका न्यायाधीशांची व्हिडीओ क्लिप नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाज यांनी प्रसिद्ध केली आहे. लाहोरमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मरियम यांनी ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांच्या प्रकरणाबाबत सर्व न्यायप्रक्रिया प्रभावित केली गेली. इस्लामाबाद न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद मलिक यांनी आमच्या पक्षाचे समर्थक नसीर भट्ट यांच्यासोबत बोलताना हे मान्य केले आहे की, शरीफ यांच्याविरोधात निर्णय देण्यासाठी त्यांना अज्ञात लोकांनी ब्लॅकमेल केले होते आणि आमच्यावर दबाव टाकला गेला होता.