पत्रकार खासदारांची पत्रकारिता

– द. वा. आंबुलकर 

आपल्या पूर्वायुष्यात वा आधी पत्रकारिता करून सध्या संसदेत खासदार म्हणून कार्यरत असणाऱ्या खासदार-पत्रकारांनी आपल्या खासदारकीला पत्रकारितेची जोड देण्याच्या दृष्टीने “सेंट्रल हॉल’ नावाचे आगळे-वेगळे मासिक प्रकाशनच सुरू केले असून संसदेच्या सभागृहाबाहेरील या “सेंट्रल हॉल’मध्ये खासदार मंडळी आपल्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन प्रकाशन करीत असतात हे विशेष.

तसे पाहता भारतीय संसदेत पत्रकारांचे प्रतिनिधित्व संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या उभय सभागृहात नेहमीच राहिले आहेत. सध्याच्या म्हणजेच 15 व्या लोकसभेच्या कार्यकाळाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास सध्या लोकसभा व राज्यसभा मिळून असणाऱ्या खासदारांमध्ये चंदन मित्रा, शोभना भारतीय, एच. के. दुआ, शहीद सिद्दिकी, राजीव शुक्‍ला, विजय दर्डा, बलवीर पुंज, मधू गौड यातशी, राजीव प्रताप रुडी यासारखी मंडळी खासदार म्हणून कार्यरत आहेत.

खासदारांच्या मासिक पत्रिकेच्या प्रकाशनाच्या संदर्भात राजीव प्रताप रुडी सांगतात की “सेंट्रल हॉल’ या मासिकाच्या प्रकाशनामागचा मुख्य उद्देश संसद आणि संसद सदस्यांचे काम व त्याचसोबत असणारे इतर पैलू व मुद्दे प्रकाशित व्हावेत व त्यामध्ये खासदार मंडळी करीत असणाऱ्या राजकारणाशिवायच्या इतर मुद्द्यांचा पण समावेश व्हावा हा होता.
हा उद्देश बऱ्याच अंशी साध्य झालेला दिसून येतो. खासदारांच्या सेंट्रल हॉल या खास मासिकात ओमर अब्दुल्ला यांनी मोटरसायकलवरील आपला थरारक प्रवास, राजीव प्रसाद रुडी यांनी इंडिगो एअरलाईन्सचे वैमानिक म्हणून त्यांना आलेले विविध अनुभव, पर्यावरण राज्यमंत्री जया पांडा यांना हेलिकॉप्टर चालवताना आलेले रोमहर्षक अनुभव इ.चा या लिखाणामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

“सेंट्रल हॉल’च्या स्तंभाद्वारेच सर्वांना कळले की दक्षिण मुंबईचे माजी खा. मिलिंद देवरा व मथुरेचे माजी खासदार जयंत चौधरी हे उभय खासदार चांगले गिटारवादक आहेत. ओबामांच्या भारत भेटीदरम्यान एका अनौपचारिक कार्यक्रमात तर मिलिंद देवरांच्या गिटारवादनाने तर खुद्द ओबामा प्रभावित झाले होते.

संसदेच्या राजकीय मैदानावर राजकीय संदर्भात एक-दुसऱ्याच्या गोलंदाजीवर फटकार-षटकार मारणारे ज्योतीरादित्य शिंदे व दुष्यंत हे भाऊ फावल्या वेळात आवर्जून क्रिकेट खेळतात तर भाजप खासदार रवी शंकर यांना प्रत्यक्षात क्रिकेट खेळण्यात रुची नसली तरी त्यांच्याजवळ जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरीसह असणाऱ्या बॅट्‌सचा मोठा संग्रह मात्र आहे ही बाब इतरांना कळली ती या मासिकामुळेच.

एवढेच नव्हे तर दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये शिकत असताना माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल व मोंटेकसिंह अहलुवालिया यांनी नाटकांमध्ये एकत्र काम केल्याची सचित्र दखल सेंट्रल हॉलमध्येच घेण्यात आली आहे. याशिवाय कपिल सिब्बल यांच्या “आय विटनेस’ या काव्यसंग्रहाचे परीक्षण “सेंट्रल हॉल’मध्ये प्रकाशित झाल्यावरच त्यांच्यातल्या राजकारण्यातील कवीचा परिचय सर्वांना झाला. संसदेत सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य म्हणून एकमेकांवर आरोप करून एकदुसऱ्यांच्या उखाळ्यापाखोळ्या काढणाऱ्या खासदारांचे राजकारणापलीकडे जाऊन होणारे लिखाण व त्यानिमित्ताने त्यांचा आम जनता-मतदारांना होणारा परिचय या बाबी संसद सदस्यांच्या “सेंट्रल हॉल’ या मासिक प्रकाशनामुळेच शक्‍य झाल्या आहेत ही बाब पण यानिमित्ताने सर्वांना स्पष्ट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)