एकत्र कुटुंब

सध्या मालिकांमधून सर्व वाहिन्यांवर एकत्र कुटुंब दाखवली जातात. कारण त्यामुळे जास्तीत जास्त पात्र आणि प्रत्येकाची कहाणी वेगळी त्यामुळे अर्थातच मालिकेची लांबी अधिक असं सगळं ते गणित असत.

पूर्वी अर्थव्यवस्था जेव्हा शेतीवर आधारलेली होती. तेव्हा शेती कुटुंबाच्या सामायिक मालकीची होती. संपूर्ण कुटुंबाचा व्यवसाय एकच होता. तेव्हा घरातले सगळे भाऊ एकत्र राहत होते. त्यामुळे कुटुंबात आई-वडील, मुले, सुना, नातवंडे असा मोठा गोतावळा असायचा. सगळेजण थोड्याफार कुरबुरी सोडल्यास गुण्यागोविंदाने नांदत असत. या कुरबुरींमुळेच संसार म्हटला की भांड्याला भांडं लागायचच, ही म्हण आली असावी.

या घरात सगळे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. लग्न, मुंज म्हटलं की, गृहिणींची तारांबळ उडायची. कारण पूर्वी तयार वस्तू बाजारात मिळत नसत तर सगळं घरातल्या स्त्रियांना करावं लागे. त्यामुळे त्यांना कामे संपतच नसत.
यात बदल झाला तो पावसाची अनियमितता आणि दुष्काळ यामुळे. कारण शेतीत अनिश्चितता आली आणि आपोआपच आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला. गावातले इतर व्यवसायही शेतीवर अवलंबून त्यामुळे त्यावरही परिणाम झाला. यावर पर्याय सापडला तो औद्योगिककरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या शहरांमध्ये स्थलांतर करणं आणि त्यामुळे आपोआपच विभक्‍त कुटुंबपद्धती आली.

-Ads-

एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे तडजोड करणं, जमवून घेणं, इतरांचा विचार करणं, त्याग करणं हे गुण माणसाच्या अंगी आपोआपच येत असत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा प्रश्न असेल तर तो सोडवायला इतर व्यक्तीसही मदत करत असत. त्यामुळे भावनिक आधार असायचा. विभक्त कुटुंबात मात्र असे मार्गदर्शन, भावनिक आधार नसतो. विभक्त कुटुंबात एकट्या स्त्रीला सगळी कामं करतांना तारांबळ होते. अर्थात वेळं राहिल्याने स्वत:ला आवडेल त्या जीवनशैलीने वागणे, स्वत: निर्णय घेणे, त्या निर्णयाची जबाबदारी घेणे हे करता येत असल्याने अनेकजण तीच जीवनशैली पसंत करू लागले. परंतु पूर्वी लहान मुले आजी आजोबांजवळ राहत. आता पाळणाघराचा आधार घ्यावा लागतो.

एकत्र कुटुंबपद्धती हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य मानले जायचे. परंतु, बदलाचे वारे वाहू लागले आणि अशी कुटुंबपद्धती प्रत्यक्षात कमी आणि साहित्य, मालिका यामध्ये अधिक दिसू लागली. कारण त्याशिवाय नात्यांमधील संघर्ष अधोरेखित करता येत नाही.

शहरात स्थलांतरित झालेली कुटुंबे पुन्हा गावाकडे परतलीच नाहीत इतकी त्यांना शहरी जीवनाची भुरळ पडली. परंतु बदल तया सामाजिक, भावनिक परिस्थितीत पुन्हा एकत्र कुटुंबाकडे वळावे लागते की काय?

– डॉ. नीलम ताटके

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)