प्रकाश आंबेडकरांकडून महामानवांच्या विचारांनाच गालबोट -प्रा. जोगेंद्र कवाडे

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची वंचित बहुजन आघाडीवर टीका

नगर – जातीच्या अंताच्या नावाखाली लढणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी नगर येथे केली.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची शनिवारी नगरला बैठक आयोजित केली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रा. कवाडे यांनी देश, राज्याच्या विविध प्रश्‍नांवर मते मांडली.

प्रा. कवाडे म्हणाले, “भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजावरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे. आरएसएसचे मोहन भागवत हे रिमोट कंट्रोलने सरकार चालवित आहेत. हे घटनाबाह्य समांतर सरकार आहे.’ भाजप आणि आरएसएसचे नेते जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. आरएसएसला मनूवादी अजेंडा या देशात राबवायचा आहे. आरएसएसचे गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकामध्ये मानवतावादाला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांना संविधानातील समानता, सर्वांना समान संधी ही तत्वे नको आहेत. हिंदू राष्ट्र ही संकल्पना फक्‍त आरएसएसवाल्यांना पाहिजे. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका आहे. भविष्यात प्रत्येक समाज स्वतंत्र राष्ट्राची मागणी करेल, अशी भीतीही कवाडे यांनी व्यक्त केली.

भाजपला मागील लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या 37 टक्के मते मिळाली होती. तरीही स्पष्ट बहुमत प्राप्त झाले होते. उर्वरित मतांचे विभाजन झाल्याने धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेवर आले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षांनी महाआघाडी स्थापन केली आहे. सर्वांनी एकत्र येऊन संविधानाच्या रक्षणासाठी भाजप-आरएसएसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असेही ते प्रा. कवाडे म्हणाले.

कोट्यवधींचे कर्ज घेऊन पळणाऱ्यांचा विकास

भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्यांक समाजावरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे. जम्मू -काश्‍मिरमध्ये अल्पसंख्यांक समाजातील आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार होतो. या गुन्ह्यातील आरोपींच्या समर्थनार्थ भाजपाचे दोन विद्यमान मंत्री मोर्चाचे नेतृत्व करतात. फक्‍त उद्योगपती अंबानी, अंदानी आणि बॅंकांचे कोट्यावधींचे कर्ज घेऊन पळणाऱ्यांचा विकास झाल्याचे प्रा. कवाडे यांनी म्हटले.

डॉ. सुजय विखेंसारख्यांना तत्काळ सत्ता पाहिजे

डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. काही राजकारण्यांचे मुले आणि नातू हे राजकारणात आले आहेत. त्यांनी राजकारणात येणे चुकीचे नाही. त्यांना तत्काळ सत्ता पाहिजे आहे. राजकारणात नेता होण्याची मोठी प्रक्रिया असते. समाजाची कामे करावी लागतात. पक्षासाठी योगदान, वेळ द्यावा लागतो. त्यातून जनता त्या व्यक्‍तीला नेता म्हणून स्वीकारत असते. त्या सर्वांना प्रा. कवाडे यांनी शुभेच्छाही व्यक्‍त केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)