नेवासा, (प्रतिनिधी) – जळके बुद्रूक (ता.नेवासा) येथील पोलीस पाटील अशोक पुंड याने गावातील बळीराम नाईक (वय ५०) याला धारदार शस्ञाने वार करून गंभीर जखमी करण्याची घटना नुकतीच जळके येथे घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पाटलाच्या कथित कारनाम्याचा अहवाल प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्याची माहिती नेवासा पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
दरम्यान, पोलीस पाटील अशोक पुंड याने धारदार शस्ञाने नाईक यांच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्यामुळे जखमी नाईक यांच्यावर नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेवासा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोलीस पाटलावर भादंवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्यामुळे गावकऱ्यांतून पोलीसांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जखमीच्या पत्नी सुनिता नाईक व नातेवाईकांनी सोमवारी (दि.८) दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी देऊन पोलीस पाटलावर वाढीव कलमे लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या गंभीर घटनेची दखल वेळीच पोलिसांनी न घेतल्यास याबाबत लवकरच पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सुनिता नाईक यांनी सांगितले.