शनिवारी पेटाळा येथे रोजगार मेळावा; ‘अशी’ करा ऑनलाईन/ऑफलाईन नोंदणी

पुणे, मुंबई, बेंगलोर, सांगली, सातारा, कोल्हापूरातील 70 कंपन्या सहभागी होणार

कोल्हापूर: उद्योग विभागाच्यावतीने शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर 2018 रोजी पेटाळा येथे आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात पुणे, मुंबई, बेंगलोर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 कंपन्या सहभागी होणार असून या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहुजी सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबिटकर,  गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी  अशोक चव्हाण, आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगांवकर, माविमचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गुरव, उद्योग केंद्राचे प्रसाद काटाळे आदीजण उपस्थित होते.

स्थानिक व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात  या उद्देशाने येत्या शनिवारी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये व स्थानिक सुशिक्षित बेरोजगाराकडे असलेले कौशल्य यांचा ताळमेळ घालून स्थानिक तसेच इतरत्र औद्योगिक अस्थापनांमध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे.

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पेटाळा, कोल्हापूर येथे शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम दिनांक उद्या 4 ऑक्टोबर 2018 ही असून जिल्ह्यातील तरूणांनी  www.balasahebthackarayrojgarmelava.com  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ऑफलाईन नोंदणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा औद्योगिक केंद्रामध्ये करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. या मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना संभाव्य संस्था चालक/मालकाबरोबर थेट मुलाखतीव्दारे रोजगार मिळू शकतो. तसेच संस्था चालक मालकांनाही योग्य मनुष्यबळ तात्काळ मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पेटाळा येथे आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात पुणे, मुंबई, बेंगलोर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये प्रमुख्याने अपेक्स टुल्स, डी.जी. चितळे डेअरीज, भारत फोर्ज, घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट, गोदरेज विक्रोळी, हिंदुस्तान गॅसकिट ॲड स्टिल मेटल्स, हिंदुस्तान नायलॉन्स, कल्याणी स्टिल, एसीआर माहीनींग प्रा.लि., स्कायलार्क ग्लोबल, स्‍टर्लिंग लिड प्रा.लि., डुणुंग इंडस्ट्रिज, न्यू मेल्टींग सेंटर, मार्व्हलस इजिंनिंअरींग, सिंध्दार्थ फौंड्री, पद्मावती कास्टिंग, सन्मती प्रोसिशन इजिनिअरींग, कॅस्प्रो मेटल इंडस्ट्रिज, मयुर इंडस्ट्रिज, जेसन्स फौंड्री, कुपर कार्पोरेशन अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी या रोजगार मेळाव्यासाठी आपल्या नावाची नोंदणी उद्यापर्यंत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.

पेटाळा येथे आयोजित केलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी 75 दालने तयार करण्यात आली असून आतापर्यंत 4 हजार 232 तरूणांनी ऑनलाईन नोंदणी केली असून दिड हजारावर तरूणांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. या मेळाव्यात सुमारे 8 हजार सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी हेाईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केला.  हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सक्रीय योगदान द्यावे तसेच उद्योग विभागाने मेळाव्याच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करून कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या उपाय-योजना चोख पध्दतीने कराव्यात यासाठी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शक सूचना केल्या. प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश शेळके यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाय-योजनांची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)