शालेय पोषण आहाराचा माल निकृष्ट

शेवगाव-पोषण आहाराच्या साहित्याचा पंचनामा, धान्यादी निकृष्ट माल.

वजनात प्रचंड तफावत; बिले एका कंपनीची, पुरवठा दुसरीचा

शेवगाव – शालेय पोषण आहार योजनेसाठी आलेला तांदूळ व इतर माल नित्कृष्ट आढळला. त्याच्या वजनातही तफावत आढळून आली. त्यामुळे त्याचा पंचनामा करणे वाघोली (ता. शेवगाव ) येथील जागृत ग्रामस्थांनी भाग पाडले. हा माल नगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून मालाचे नमूने सील करण्यात आले आहेत.

-Ads-

जिल्हा परिषदेच्या वाघोली येथील प्राथमिक शाळेत शालेय पोषणाचे साहित्य वाहन (एम. एच. 16 क्‍यू -3763 ) गावात आले. तो माल शाळेत उतरत असताना शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी त्याचा दर्जा व वजनाची तपासणी केली. सर्व माल निकृष्ट दर्जाचा आढळला. वजनातही मोठी तफावत आढळून आली. नागरिकांनी गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांच्याशी संपर्क साधला. या मालाचा पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार, पंचनामा करण्यात आला.

तांदूळ, मूगडाळ व इतर माल निकृष्ट आढळला. त्यामध्ये किडे, खडे व काडया आढळून आल्या. हरभरा किडलेला तर मसाल्याची चव वेगळी आढळून आली. याशिवाय बिलातील तपशिलात नमूद असलेल्या कंपन्याऐवजी दुसऱ्याच बाजारू कंपन्याचा माल आणि तो वजनातही कित्येक पटीने कमी असल्याचे आढळले. तेला, मिठाची चोरही चोरी करत नाहीत असे म्हणतात; मात्र या ठेकेदाराने त्यातही काटा मारला. सोयाबीनच्या (ऍग मार्क )12 लिटर तेलाऐवजी किर्ती गोल्डचे एक लिटर तेल, तर सात किलो डबल फोर्टाफाईड मिठाऐवजी एकच किलो मीठ देण्यात आले आहे. लहान-शाळकरी बालगोपाळाच्या आहार पुरविण्याचा ठेका घेऊन चरितार्थ चालविणाऱ्या आणि किमान खाल्ल्या मिठाला तरी जागायचे अशा भावना या वेळी वृद्ध ग्रामस्थ व्यक्त करत होते.

प्रत्येक मालाचे दोन नमुने घेऊन ते सील बंद करण्यात आले. त्यातील एक नमुना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला, तर एक नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा पंचनामा गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांच्या समक्ष ग्रामस्थांनी केला. या वेळी सरपंच बाबासाहेब गाडगे, युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान भालसिंग, योगेश घोरपडे, श्रीनिवास भालसिंग, अशोक शिंगटे, कानिफ गाडगे, दगडू बोरूडे, आकाश शिरसाठ आदी उपस्थित होते.

मुलांच्या आरोग्याशी खेळ

“”शालेय पोषण आहार योजना शासनाने चांगल्या हेतूने चालवली आहे; परंतु ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा मालाचा पुरवठा होत आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे.” -उमेश भालसिंग, युवा कार्यकर्ते-वाघोली

वजकाटा, विमा आणि चालक परवानाही नाही

शालेय पोषण आहाराचा माल देण्यासाठी पुरवठा करणाऱ्या वाहनात वजनकाटा उपलब्ध नव्हता. वाहनचालक अभिमान त्रिंबक पोटे (रा. गितेवाडी) यांच्याकडे वाहन चालक परवाना व वाहनाचा विमा आढळून आला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)