एक जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू
श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. तर एक नागरिक मृत्युमुखी पडला.
पुलवामा जिल्ह्यातील देलीपोरा भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याचा संशय असलेल्या घराला सुरक्षा जवानांनी वेढले. त्यांनी प्रथम लगतच्या रहिवाशांना सुरक्षितपणे इतरत्र हलवण्यास सुरूवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्या माऱ्यात लष्कराचे जवान संदीप आणि नागरिक रईस दर असे दोघे मृत्युमुखी पडले.
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यात तीन दहशतवादी ठार झाले. नासीर पंडीथ, उमर मीर आणि खालिद अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. खालिद हा संबंधित भागात जैशचा म्होरक्या म्हणून सक्रिय होता. त्याच्यासह तिघांचा खात्मा जैशसाठी मोठाच हादरा मानला जात आहे.