काही अटींवर ‘जेट’ला मदत करण्याची बॅंकांची तयारी

नवी दिल्ली  -जेट एअरवेज या नागरी विमान वाहतूक कंपनीला काही अटींवर भांडवल पुरवठा करण्याची शक्‍यता देशातील सरकारी बॅंकांनी सूचित केली आहे.

या कंपनीच्या प्रवर्तकांनी जर त्यांच्याकडील शेअर अनामत म्हणून ठेवले तर, त्या बदल्यात बॅंका भांडवल पुरवठा करू शकतात. या कंपनीतील प्रवर्तक ऐतिहाद एयरवेज या कंपनीनेही आपले शेअर अनामत म्हणून ठेवण्याची गरज असल्याचे बॅंकांनी सांगितले आहे. खेळते भांडवल नसल्यामुळे या कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्याचबरोबर विमानाची लीजची रक्‍कम न दिल्यामुळे कंपनीची अनेक विमाने पडून आहेत. आता ही विमाने स्पर्धक कंपन्यांना देण्याचा लीजधारकांचा विचार असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर कंपनीने या पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या हप्ता दिलेला नाही.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने या विषयावर बैठक घेतलेली आहे. या बैठकीत सरकारने बॅंकांना मदत करण्याची सूचना केली असल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या काळात एखादी मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी बंद पडू नये आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी बेरोजगार होऊ नये असे सरकारला वाटते. गेल्या दोन महिन्यांपासून या कंपनीचे व्यवस्थापन अनेक कंपन्या आणि बॅंकांची चर्चा करीत आहे. मात्र, यातून आतापर्यंत ही मार्ग निघालेला नाही. कंपनीवर 8 हजार 200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याचबरोबर कंपनीला सध्याच्या कामकाजासाठी खेळते भांडवल गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)