जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

File photo

मुंबई – बॅंकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा आजपासून बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाल्याने कर्मचाऱ्यांनी जेट एअरवेजच्या ऑफिसबाहेर आज ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

जेट एअरवेज ऑफिसर्स आणि स्टाफ असोसिएशनची सध्या बैठक सुरु आहे. मात्र, बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सरकारने दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. आम्ही देशात निवडणूक सुरु असतांनाच बेरोजगार होतोय, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

जेट एअरवेज कंपनीने घेतलेला निर्णय अचानक आहे. यामुळे हजारो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. आता बैठक आहे, यात व्यवस्थापनाने या सर्व कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेतला हे सांगावे. असे अचानक कर्मचाऱ्यांना कामावरून काढता येणार नाही, असे जेट एअरवेज एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी सांगितले आहे.

बॅंकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतु काल रात्रीपासून आपली सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला.

जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्याने 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)