जेट एअरवेज कंपनीला झाला तोटा

खेळत्या भांडवलाच्या टंचाईशी कंपनीची झुंज चालूच

नवी दिल्ली – ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीचे आर्थिक निकाल जेटने जाहीर केले. यानुसार या तिमाहीत जेटला 587 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जेटने 166 कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती.

दरम्यान कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या जेट एअरवेजला आर्थिक उभारी देण्यासाठी स्टेट बॅंकेने सुचवलेल्या कर्ज पुनर्मांडणी योजनेला जेट व्यवस्थापनाने मंजुरी दिली. कर्जांचे रुपांतर भागभांडवलात करण्याची ही योजना असल्याने लवकरच जेटमध्ये स्टेट बॅंकेचा मोठा भांडवली हिस्सा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

खासगी विमानसेवा कंपन्यांमध्ये एकेकाळी आघाडीवर असणारी जेट एअरवेज सध्या कर्ज व तोट्यामुळे आर्थिक अडचणीत आली आहे. स्टेट बॅंकेच्या नेतृत्वाखालील बॅंक समूहाने जेटला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला असल्याने या कंपनीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी स्टेट बॅंक पुढे सरसावली आहे. यासाठी स्टेट बॅंकेने जेटला कर्ज पुनर्मांडणी योजना सुचवली होती. ही योजना जेटच्या संचालक मंडळाने मंजूर केल्याने जेटमधील भांडवलाची पुनर्रचना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्टेट बॅंकेने केलेल्या पाहणीनुसार जेटचे उत्पन्न व खर्च यांमध्ये 8,500 कोटी रुपयांची तूट आहे. यामध्ये जेटवर असलेल्या सतराशे कोटी रुपयांच्या कर्जाचाही समावेश आहे. नवीन भांडवल, कर्जाची पुनर्रचना, मालमत्ताविक्री आदी उपायांद्वारे ही तूट भरून काढण्याचा स्टेट बॅंकेचा प्रयत्न आहे. स्टेट बॅंकेसह अन्य बॅंकांच्या कर्जाचे रूपांतर भागभांडवलात करण्यात येणार आहे. यासाठी बॅंकांना प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 11.40 कोटी समभाग दिले जातील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)