मारामारी गुन्ह्यातील फरारी दीड वर्षांनंतर जेरंबद

कपडे फाडून स्टंट करण्याचा प्रयत्न

नागठाणे – शेरेवाडी व पिलानी (वरची) ता. सातारा येथील दोन गटात दीड वर्षांपूर्वी झालेल्या मारामारीत बोरगाव पोलिसांना गुंगारा देणाऱ्या वरची पिलानी गावच्या माजी सरपंचांना बुधवारी रात्री राहत्या घरातून ताब्यात घेतले. राजेंद्र रामचंद्र साळुंखे व बाजीराव अंतू साळुंखे अशी अटक केलेल्या आजी-माजी सरपंचांची नावे आहेत. दरम्यान पोलीस कारवाई टाळण्यासाठी यातील माजी सरपंचाने पोलिसांसमोरच स्वतःच्या पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून स्टंट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्‍टोबर 2017 रोजी सायंकाळी सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी व वरची पिलानी या दोन गावांतील युवकांमध्ये पूर्वी झालेल्या भाडणाच्या कारणावरून व एसटी बसमध्ये मुलींची छेडछाड करत असल्याचा संशयावरून तुफान धुमश्‍चक्री झाली होती. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात संबंधितांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी शेरेवाडीच्या 7 व वरची पिलानी गावच्या 13 अश्‍या 20 जणांवर गुन्हा दाखल करून त्यापैकी 18 जणांवर कारवाई केली होती. मात्र वरची पिलानी येथील बाजीराव अंतू साळुंखे व राजेंद्र रामचंद्र साळुंखे हे तेंव्हापासून बोरगाव पोलिसांना गुंगारा देत होते.

बुधवारी हे दोघेही गावात असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्ष प्रकाश राठोड व कर्मचारी हे या दोघांना ताब्यात घेण्यासाठी वरची पिलानी येथे गेले. यावेळी त्यांना राहत्या घरातुन ताब्यात घेत असताना यापैकी माजी सरपंच बाजीराव साळुंखे याने पोलीसांवर दबाव आणण्यासाठी आपल्या पत्नीचा अंगावरील कपडे फाडूनस्टंट केला. मात्र पोलिसांनी त्याच्या या स्टंटला भीक ना घालता या दोघांनाही ताब्यात घेतले.रात्री उशिरा दोघांनाही अटक करण्यात आली. या घटनेचा तपास हवालदार भगवान इंगुळकर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)