बिहारमध्ये जेडीयु-भाजपचा धडाका

जोडीने मिळवल्या 40 पैकी 38 जागा

पाटणा – “गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधात असलेले नितीश कुमार या निवडणुकीच्यावेळी भाजपच्या बरोबर असल्याचा करिष्मा यंदाचा निकालामध्ये बघायला मिळाला. बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी “एनडीए’ने 38 जागांवर विजयाचे शिक्कामोर्तब केले आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्‍त जनता दल आणि भाजपने प्रत्येकी 16 जागांचा बरोबरीचा हिशोब पूर्ण केला आहे. त्याशिवाय अन्य 6 विजयी उमदवारांची यादीही आपल्या बाजूला वळवून घेतली आहे. त्यामुळे बिहारमध्ये एकेकाळी सत्ताधीश असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला जेहानाबाद आणि पाटलीपुत्र या केवळ 2 जागांची खिरापत ठेवली गेली आहे.

विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, राधामोहन सिंह, गिरीराज सिंह, आर.के.सिंह, अश्‍विनी कुमार चौबे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी, चिराग पासवान, राम विलास पासवान यांचे बंधू पशुपती कुमार पारस यांचाही समावेश आहे. भाजपचे उमेदवार रामकृपाल यादव यांना राजदचे उमेदवार आणि लालूप्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ कन्या मिसा भारती यांच्याकडून 96 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

बिहारमधून पराभूत झालेल्या बड्या उमेदवारांमध्ये महागठबंधनचे नेते शरद यादव, अभिनेते आणि भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार जेएनयुतील माजी विद्यार्थी नेता आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेला कन्हैय्या कुमार, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश साहनी, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान आवामी मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)