अबाऊट टर्न: जेसीबी

हिमांशू

“जेसीबी की खुदाई’ हा वाक्‍प्रचार सध्या “चॅम्पियनवाली धुलाई’ इतकाच सुपरहिट झालाय, असं ऐकलं. अशा गोष्टी आम्ही फक्‍त “ऐकतो.’ आमचं सोशल लाइफ बऱ्यापैकी मोठं असलं, तरी सोशल मीडियावरचा आमचा वावर अत्यंत मर्यादित आहे. हातात मोबाइल असताना आम्ही अजूनही समोरच्याशी बोलू शकतो; सबब आम्ही “ऍबनॉर्मल’ आहोत. परंतु या आभासी दुनियेचे रीतसर नागरिकत्व मिळवलेल्या सर्वांना एव्हाना “जेसीबी की खुदाई’ चांगलीच ठाऊक झालीय. हॅशटॅग, मीम, ट्रेंड वगैरे शब्द आम्हाला आधी अपरिचित होते. परंतु चारचौघांत अब्रू जाऊ नये म्हणून आम्ही त्याबाबतची माफक माहिती नंतर जमा केली. त्यामुळेच “जेसीबी की खुदाई’ हा एक हॅशटॅग असून, सध्या तो खूपच लोकप्रिय झालाय, म्हणजे नेमके काय झालेय हे आम्हाला समजले.

या हॅशटॅगवर वेगवेगळी मीम्स शेअर केली जातायत. विनाकारण हसवणारा हा हॅशटॅग नेमका कसा आणि कुठून सुरू झाला, यावर काहीजणांनी “संशोधन’ केले, तेव्हा हैदराबादच्या एका खासदाराने केलेल्या वक्‍तव्यात त्याचे मूळ असावे, असा प्राथमिक शोध लागला. “”भारतात बेरोजगारांची संख्या बरीच असल्यामुळे लोकांना भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असेल, तरी लोक पाहात बसतात,” असे हे वक्‍तव्य होते. स्थानिक नेटकऱ्यांनी तेव्हापासून “जेसीबी की खुदाई’ हा हॅशटॅग हळूहळू देशभरात लोकप्रिय केला.

खरं तर खासदार महोदयांच्या वक्‍तव्यात विनोद असावा असे वाटत नाही आणि असलाच तर तो “करुण विनोद’ आहे. परंतु सुख असो वा दुःख, संताप असो वा खचलेपण, ते हसून साजरे करण्याची शिकवण हल्ली सोशल मीडियाच देतो. एका पठ्ठ्याने जेसीबीचा फोटो लावून त्यावर लिहिले, “”भीड का हिस्सा नहीं, भीड का कारण बनो!” तात्पर्य, जेसीबी हे गर्दी गोळा करण्याचे साधन आहे. वस्तुतः ज्याला आपण “जेसीबी’ म्हणतो, त्या साधनाचे नाव “बुलडोझर’ असे आहे. ते तयार करणाऱ्या कंपनीचे नाव “जोसेफ सिरील बामफोर्ड’ असे असून, “जेसीबी’ हे त्याचे संक्षिप्त रूप आहे. पण काय करणार? पूर्वी सगळ्याच वॉशिंग पावडर “निरमा’ होत्या आणि सगळ्याच टूथपेस्ट “कोलगेट’ होत्या. माणसांचे स्थलांतर समाजातून समाजमाध्यमात झाले, तरी ही मानसिकता कशी बदलणार? असो! एकंदरीत बेरोजगारी आणि त्यातून येणारा रिकामटेकडेपणा सेलिब्रेट करायला ही नवमाध्यमे शिकवताहेत, ही चांगली गोष्ट आहे. सिनेमातली दृश्‍ये, क्रिकेटपटूंचे फोटो वगैरे वापरून त्यांची मीम्स बनवायची आणि “जेसीबी की खुदाई’ असे शीर्षक देऊन पुढे ढकलत राहायचे… चित्र, शब्द, वेळ, दिवस आणि बेरोजगारीचे शल्य… सगळंच! खूपच सकारात्मक संकल्पना आहे.

“जेसीबी’ कंपनीची मधल्यामध्ये खूपच प्रसिद्धी झाली… खर्च न करता! ती कंपनीपर्यंत पोहोचलीसुद्धा! मग काय! कंपनीनेसुद्धा “”भारतीय लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत,” असा संदेश पाठवला. एकंदर जेसीबी हे प्रतीक ठरले. खरंतर ते खोदकाम करण्याचे साधन. पण प्रत्येक खोदकाम “उत्खनन’ ठरत नाही. म्हणूनच कितीही खोदले तरी सत्याचा खजिना कुणालाच सापडत नाही. खरे जेसीबी कुणालाच दिसत नाहीत. पूर्वी खोऱ्याने पैसा ओढणाऱ्यांनी आता त्यासाठी लावले जेसीबी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)