जायकवाडीला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

File photo

पालकमंत्र्यांचे मौन; धरणाच्या दोन पाणीपातळ्या दाखविण्याचा पराक्रम!

नगर व नाशिकवर अन्याय

कालवा समितीची बैठक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार या बैठकीला उपस्थित राहून जायकवाडीच्या पाणी वाटपावर आणि उंचीवर आक्षेप घेणार असल्याची माहिती आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली. 15 ऑक्‍टोबरच्या आत नगरमधील धरणे खाली करण्याचा उद्योग सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यावर हा अन्याय होणार आहे. शेतीच्या पाण्यासाठी जायकवाडीवर निर्बंध नाहीत. त्याचा परिणाम नगरवर होतो. या सर्व गोष्टी कालव्या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर – जायकवाडी धरणातील पाण्याच्या दोन वेगवेगळ्या पातळ्या दाखविण्यात आल्या आहेत. त्यातून नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. जायकवाडीला फक्त पिण्यासाठी पाणी द्या, त्या व्यक्तिरीक्त एकही थेंब पाणी देऊ नका, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज टंचाई आढावा बैठकीत केली. आमदारांच्या या भूमिकेवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मात्र मौन धारण केले. जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढू, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

-Ads-

जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट आतापासून जाणवायला लागले आहे. त्याचे पडसाद टंचाई आढावा बैठकीत उमटले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, राहुल जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी या वेळी उपस्थित होते.

जायकवाडी धरणातील पाणी पातळीचा मुद्दा या वेळी चर्चेत आला. आ. मुरकुटे आणि विखे पाटील यांनी तो लावून धरला. जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट पाहता धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी 15 ऑक्‍टोबरच्या आत पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकाराला जिल्ह्यातील आमदारांनी टंचाई आढावा बैठकीत कडाडून विरोध केला. प्रा. शिंदे यांनी मात्र या मुद्यावर जलसंपदामंत्र्यांकडे बोट दाखवून वेळ मारून नेली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले. शिंदे यांच्या याभूमिकेनंतर मात्र आ. मुरकुटे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

मुरकुटे म्हणाले, “”जायकवाडीला पाणी देण्याची आवश्‍यकता नाही. एमडब्ल्यूआरआर कायद्यातील 11 (अ) मधील तरतुदींनुसार पिण्यासाठी पाणी देण्यास हरकत नाही. या कायद्यातील 12 (6) तरतुदींनुसार भरपूर पाणी असताना ते देऊ नये. जायकवाडीला पाणी दिल्यास नगरमधील पाणी समस्या गंभीर होणार आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी देण्यास जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांचा विरोध आहे. नेवासे तालुक्‍यातील शेतकरी नानासाहेब कऱ्हाडे यांनी जायकवाडी धरण्याच्या उंचीवरदेखील आक्षेप घेतला आहे. ही उंची चुकीची असल्याची तक्रार त्यांनी एमडब्ल्यूआरआरकडे केली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून आपणही तक्रार केली आहे. या उंचीसाठी 2005 मध्ये करण्यात आलेल्या कायद्यावरदेखील आमचा आक्षेप आहे. हे आक्षेप घेण्याचे कारण म्हणजे सरकारने धरणातील पाणीसाठ्याच्या दोन पातळया दाखविल्या आहेत. सरकारचे पाणीपातळीबाबत दोन अहवाल आहेत. त्यात एक 431 मीटर, तर दुसरी 437 मीटर पाणीपातळी आहे. या दोन्ही पाणीपातळीचा अभ्यास केल्यास त्यात सात मीटरची तफावत आढळते. या तफावतमध्ये 25 ते 26 टीएमसी पाण्याचा फरक पडतो. हा मृत साठा दाखविण्यात आला आहे. तो साठा मृत नसून जिवंत आहे. त्यावरच आमचा आक्षेप आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)