जायकवाडीला पाणी सोडल्यास ‘जलसमाधी’

राहुरी - जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देताना शिवाजी गाडे, शिवाजी डौले, चाचा तनपुरे, सर्वपक्षीय आंदोलक कार्यकर्ते.

राहुरीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटनांचे ‘रास्ता रोको’ 

राहुरी – मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचे पडसाद तालुक्‍यात उमटत असून राहुरी येथे भाजप वगळता सर्वच पक्षीयांनी एकत्र येत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. दारूच्या कारखान्यांसाठी सत्ताधाऱ्यांनी दलाली घेत नगर व नाशिक जिल्ह्याचे वाळवंट करण्यासाठी जायकवाडीला पाणी सोडले जात असून पाणी सोडल्यास नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, सेना, शेतकरी संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले, की शेतकरी यापुर्वीच देशोधडीला लागला आहे. किमान पोट भरण्यासाठी थोडेफार पाणी मिळेल व शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल याची अपेक्षाही जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याच्या निर्णयाने संपुष्टात आली आहे.

समन्यायी पाणी वाटप कायदा जसा संसदेत तयार केला जातो, तसा तो रद्दही होतो. मात्र, संसदेत नगर जिल्ह्याच्या हिताबाबत लढा देणारे लोकप्रतिनिधी ब्र शब्द काढत नसल्याने समन्यायी पाणी वाटपाचे भूत दरवर्षी नगर व नाशिक जिल्ह्यासाठी शाप ठरत आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय माहीत होताच जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या तीन आमदारांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पाणी सोडू नये म्हणून निवेदन देत नौटंकी केली असल्याचा आरोपही तनपुरे यांनी केला.

सेनेचे जिल्हाध्यक्ष पै. रावसाहेब खेवरे यांनी आ. शिवाजी कर्डिले यांनी भाजपच्या सत्ताकाळात एक थेंब पाणीही जायकवाडीला जाऊ देणार नाही, असा शब्द राहुरीकरांना दिला होता. त्या शब्दाची जाणीव आ. कर्डिले यांनी ठेवावी व पाणी सोडल्यास तात्काळ राजीनामा देऊन सर्वसामान्यांसोबत रस्त्यावर उतरावे अन्यथा तुम्हाला घाटाखाली उतरून देणार नसल्याचा इशारा पै. खेवरे यांनी दिला.

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी भाजपच्या लोकांनी फसवा फसवीचे धंदे बंद करावे. मुळाचे पाणी जायकवाडीला जाऊ न देण्याचा शब्द देणाऱ्यांना सर्वसामान्य जनता कधीच माफ करणार नाही असे सांगितले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी शासनावर टिकेचा भडीमार करून दारूच्या कारखान्यांसाठी शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळविले जात असल्याचे सांगितले. मुळातून जायकवाडीला पाणी सोडल्यास सर्व आंदोलक नदी पात्रात उड्या घेऊन आपले जीवन संपवतील, त्यास शासन व प्रशासन जबाबदार असेल अशा इशारा मोरे यांनी दिला.

यावेळी दिलीप इंगळे यांनीही शासनाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनावेळी बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, पालिकेचे विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे, तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले, मराठा महासंघाचे शिवाजी डौले, मच्छिंद्र सोनवणे, छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, राजेंद्र खोजे, मच्छिंद्र गुंड, राजेंद्र जाधव, भाऊसाहेब कोहकडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

तहसीलदार अनिल दौंडे व पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना निवेदनात दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. आंदोलनावेळी दोन्ही बाजूने दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिस प्रशासनाने तब्बल अर्धा तास नगर मनमाड रस्त्यावर पहारा दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)