लष्करी आणि निमलष्करी दलातील 131 जवानांना शौर्य पुरस्कार
मेढा – देशाच्या रक्षणासाठी अतुलनीय पराक्रम करणाऱ्या लष्करी आणि निमलष्करी दलातील 131 जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला असून जम्मू-कश्मीरात पुलवामा येथे दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे सातारा जिह्यातील मोहाट गावचे सुपुत्र शहीद जवान रवींद्र बबन धनावडे यांना “शौर्यचक्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या तिन्ही दल आणि निमलष्करी दलाच्या 131 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर होते. राजपूत रेजिमेंटचे शहीद जवान क्रमा पालसिंह यांना सर्वोच्च “किर्तीचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना पालसिंह शहीद झाले होते. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिह्यातील ते होते.
दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या मुख्य उपस्थित झालेल्या शौर्यचक्र पुरस्कार प्रदान सोहळ्यात यात सातारा जिह्यातील जावळी तालुक्यातील मोहाटा गावचे शहीद जवान रविंद्र बबन धनावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यंच्या पत्नी व आई उपस्थित होत्या. पुरस्कार घेताना शहीद रवींद्र यांच्या आई जनता बबन धनावडे या भावुक झाल्या होत्या. दि. 26 ऑगस्ट 2017 रोजी दक्षिण काश्मिरातील पुलवामा येथे पोलीस कॉम्प्लेक्सच्या निवासी इमारतीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका होता त्या अनुषंगाने सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी हे ऑपरेशन राबविले होते. यात जवान रविंद्र धनावडे यांनी अतुलनीय कामगिरी बजावली होती आणि दोन दहातवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे अनेक पोलीस कुटुंबियांचे प्राण वाचले होते. यावेळी दहशतवादी हल्ल्यात जवान रविंद्र धनावडे यांच्यासह आठ जवान शहीद झाले होते.