जनता पक्षाची लाट

लोकसभा निवडणूक : 1977

– विनायक सरदेसाई 

1977 मध्ये झालेल्या सहाव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांना पार्श्‍वभूमी होती आणीबाणीची. या निवडणुकांनी देशाचे राजकारणच पूर्णतः बदलून टाकले. आणीबाणीच्या काळात झालेल्या हुकूमशाही वर्तणुकीने त्रासलेल्या मतदारांनी पहिल्यांदाच तीन दशकांची कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकली. भारतीय मतदार सूज्ञ आहे, त्याला कोणीही गृहित धरू नये याचे प्रत्यंतर या निकालांनी दिले.

25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. विरोधकांची ताकद जवळपास संपुष्टात आल्यासारखी स्थिती झाली होती. 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही पुढील निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या. अशातच 18 जानेवारी 1977 रोजी आणीबाणीदरम्यानच लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. धरपकड करण्यात आलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही सोडून देण्यात आले.

आणीबाणी लागू करण्यापूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात आघाडी उघडली होती. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनाला साद देत सर्व विरोधी पक्ष कॉंग्रेसचा मुकाबला करण्यासाठी एका व्यासपीठावर आले. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींचा जनसंघ, चरणसिंगांच्या नेतृत्वाखालील भारतीय लोकदल, स्वतंत्र पार्टी, सोशालिस्ट पार्टी आदींनी मिळून 23 जानेवारी रोजी जनता पार्टीची स्थापना केली. निवडणूक प्रचार सुरू झाला तेव्हा मतदारांमध्ये शांतता होती. मात्र जनता पार्टीच्या सभांना हळूहळू गर्दी वाढू लागली आणि देशाचा मूड समोर येऊ लागला. प्रत्यक्षात मतदान झाले तेव्हा 60 टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या निवडणुकांमध्ये पाच राष्ट्रीय पक्षांसह 34 पक्षांनी आपले नशीब आजमावले. 23 मार्च 1977 रोजी निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालांनी देशाचे राजकीय चित्र बदलून टाकले. 30 वर्षे सत्तेची उब पांघरुन बसलेल्या कॉंग्रेसला मतदारांनी बाहेरचा रस्ता दाखवला आणि देशात पहिले बिगरकॉंग्रेसी सरकार स्थापण्याची संधी दिली. 24 मार्च 1977 रोजी जनता पक्षाचे संसदीय नेते मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. चरणसिंग, जगजीवन राम, अटलबिहारी वाजपेयी, एल. के. अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, सुरजितसिंग बर्नाला आणि सिकंदर बख्त यांनीही मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला. राजनारायण, मधु दंडवते, शांतीभूषण, हेमवतीनंदन बहुगुणा आणि बिजू पटनायक हेदेखील मोरारजींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य बनले.

अनेक राज्यांत कॉंग्रेसचा सुपडासाफ
1977 च्या निवडणुकीत अनेक राज्यांत कॉंग्रेसला खातेही उघडणे महाकठीण झाले. राजस्थानात 25 पैकी 24 जागांवर जनता पक्षाने विजय मिळवला. केवळ नागौरमधून कॉंग्रेसचे नाथुराम मिर्धा विजयी झाले. मध्य प्रदेशात 40 पैकी केवळ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला विजय मिळवता आला. तेथील गार्गीशंकर मिश्रा हे मध्य प्रदेशचे एकमेव खासदार ठरले. पंजाबमध्ये सर्वच्या सर्व जागा अकाली दल आणि जनता पक्षाने विजय मिळवला.

आंध्र आणि कर्नाटकने राखली कॉंग्रेसची लाज
देशभरातून जनमत विरोधात गेल्यानंतरही कॉंग्रेसला दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांनी तारले. आंध्र प्रदेशात 42 पैकी 41 जागांवर कॉंग्रेस चे उमेदवार विजयी झाले. या राज्यातील केवळ नांदयाल या एका मतदारसंघात जनता पक्षाचेउमेदवार नीलम संजीव रेड्डी विजयी झाले. अशाच प्रकारे कर्नाटकातील 28 पैकी 26 जागांवर कॉंग्रेसला विजय मिळाला. तेथे बंगळुरू दक्षिण आणि हासन या दोन जागांवर जनता पक्षाच्या उमेदवारांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांवर मात केली.

इंदिरा आणि संजय गांधीही पराभूत
जनता पक्षाच्या लाटेची तीव्रता इतकी होती की कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली. खुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून 55 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. तेथे राजनारायण यांनी विजय मिळवला. दुसरीकडे अमेठीमधून संजय गांधीही 75 हजार मतांनी पराभूत झाले.

ठळक वैशिष्टे
– 18 जानेवारी 1977 रोजी लोकसभा भंग करण्यात आली
– 542 लोकसभेच्या जागा
– 32,11,74,327 मतदार
– 60.49 टक्‍के मतदान
– 5 दिवसांत पूर्ण झाली मतदानाची प्रक्रिया
– 3,73,910 पोलिंग बूथ
– 23 कोटी मतदानावरील खर्च
– 0.70 पैसे प्रति मतदार खर्च
– 34 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात
– 05 राष्ट्रीय पक्ष
– 15 प्रादेशिक पक्ष
– 70 महिलांनी लढवली निवडणूक
– 41 महिलांना राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी दिली
– 19 महिला विजयी झाल्या
– 1356 उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली
– 2349 एकूण उमेदवार रिंगणात

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)