इंडियन सुपर लीग : जमशेदपुर एफसी, एटीकेने केली अनपेक्षित कामगिरी

पुणे – यंदाचा इंडियन सुपरलीगचा मौसम संपला असून या मोसमात बंगळुरू एफसीने अपेक्षित कामगिरीकरत यंदाचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. मात्र, यंदा जमशेदपुर आणि एटीकेच्या संघांनी संमिश्र कामगिरीकरत आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर खराब कामगिरी करत स्पर्धेत निराशा केली. तर, यंदा स्पर्धेत सर्वात समतोल्प संघ घेऊन मैदानात उतरलेल्या एफसी पुणे सिटीच्या संघाने पहिल्या टप्प्यात संपुर्ण निराशा केल्या नंतर अखेरच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली. मात्र त्यांची ही कामगिरी त्यांना बाद फेरीत पोहोचवण्यास पुरेशी नव्हती.

यंदाच्या मोसमात जमशेदपूर एफसीची कामगिरी खराब नाही आणि पुरेशी चांगली सुद्धा नाही राहिली. जमशेदपूर एफसीला आश्वासक सुरवातीनंतर जास्त बरोबरी पत्कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांची बाद फेरीची संधी हुकली. अखेरपर्यंत पहिल्या चार संघांसाठी त्यांचे आव्हान कायम होते. त्यांच्या संघात गुणवत्ता होती. मायकेल सुसैराज आणि टिरी यांनी चांगला खेळ केला. सुसैराजने पदार्पणात प्रभाव पाडला. टीम कॅहील आणि सर्जिओ सिदोंचा यांना दुखापतींचा फटका बसला, पण मारीओ आर्क्वेस आणि मेमो यांनी मध्य फळीत भक्कम भागिदारी निर्माण केली. बाद फेरी हुकणे मात्र या संघासाठी निराशाजनक ठरले.

तर, एटीकेने सर्वांच्या आशा उंचावून अखेरीस निराशा केली. एटीकेच्या संघात अनेक स्टार खेळाडू होते. त्यांचे राखीव खेळाडू सुद्धा इतर कोणत्याही क्‍लबकडे मुख्य संघात स्थान मिळविण्याच्या दर्जाचे होते, पण दुखापतींमुळे गेल्या मोसमापासून सुरु झालेला ताप यावेळीही कायम राहिला. गोल करणाऱ्या खेळाडूंची उणीव त्यांना भासली. बचाव फळीत मात्र स्टीव कॉपेल यांच्या संघाला आंद्रे बिके आणि जॉन जॉन्सन यांच्यामुळे चांगली साथ मिळाली. एमिलीयानो अल्फारो आणि कालू उचे या स्ट्रायकर्सना झालेल्या दुखापती पाहता कॉपेल यांना नियोजनात बदल करावा लागला. एदू गार्सिया आणि मॅन्युएल लॅंझरॉत यांना सातत्य राखता आले नाही. कोमल थातल आणि अंकित मुखर्जी या दोन गुणवान खेळाडूंचा उदय एटीकेसाठी उल्लेखनीय ठरला.

तर, एफसी पुणे सिटीला वेळीच सावरण्यात अपयश आल्याने त्यांचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते. मोसमाच्या प्रारंभी तीनच सामने झाल्यानंतर पुणे सिटीला प्रशिक्षक बदलावे लागले. निर्णायक विजय मिळविण्यात हा संघ झगडत होता. त्यामुळे मोहीमेला गती अशी येत नव्हती. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्या चांगल्या प्रयत्नांमुळे संघ स्थिरावला. हिवाळी ब्रेकच्या सुमारास फिल ब्राऊन यांच्याकडे सुत्रे आली. अखेरच्या आठ सामन्यांत पुण्याचा एकच पराभव झाला. बाद फेरीसाठी झुंजण्याची क्षमता या संघाने दाखवून दिली. यामुळे पुढील मोसमासाठी हा संघ आतूर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)