तर काश्‍मीर खोऱ्यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते…

जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालांचे खळबळजनक वक्तव्य 
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये येत्या 8 ऑक्‍टोंबरपासून पंचायत निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक विधान केले आहे. काश्‍मीरच्या बाबतीत भारताने चूका केल्या. या चूकांमुळे काश्‍मीर खोऱ्यातील जनतेपासून भारताची नाळ तुटू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
एका मुलाखतीत सत्यपाल मलिक म्हणाले, काश्‍मीर खोऱ्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर आपला भर आहे. जेणेकरुन केंद्र सरकारला पुन्हा मुख्य प्रवाहातील पक्षांबरोबर चर्चा सुरु करता येईल. पाकिस्तानच्या सहभागाची अट ठेवली नाही तर हुरियतही या चर्चेत सहभागी होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
काश्‍मीर खोऱ्यात येत्या आठ ऑक्‍टोंबरपासून पंचायत निवडणूकांना सुरुवात होणार आहे. दहशतवादी संघटनांनी या निवडणूका घेऊ नयेत, अशी धमकी दिली आहे. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या काश्‍मीरमधील प्रमुख पक्षांनी या निवडणूकांवर बहिष्कार घातला आहे.
भारताने काश्‍मीरचा प्रदेश जबरदस्तीने व्यापलेला नाही. स्वत:च्या इच्छेने काश्‍मीर भारताबरोबर आला आहे. त्याला भारतव्याप्त काश्‍मीर म्हणता येणार नाही. कोणी याला व्यापून टाकणे म्हणत असेल तर तो वेगळा विषय आहे. असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काश्‍मीरच्या बाबतीत काही चूका झाल्या हे तुम्ही म्हणू शकता. असे सत्यपाल मलिक म्हणाले.
कलम 370 आणि 35 अ संदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले कि, मी निवडून आलेलो लोकप्रतिनिधी नाही. पण निवडून आलेले सरकार सत्तेवर येईपर्यंत कलम 35 अ संदर्भातील सुनावणी स्थगित करावी, असे माझे मत आहे. हिमाचल प्रदेश आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्येही तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही. हा कुठला मोठा गुन्हा आहे का? राजकीय कारणांसाठी असे वाद निर्माण केले जातात, असे ते म्हणाले.दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनी सत्यपाल मलिक यांनी पदभार स्वीकारला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)