परिवर्तन मल्टिस्टेटचा खातेदारांना 9 कोटींचा गंडा

26 संचालकांसह 37 जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जामखेडकरांची अनेक संस्थांकडून फसवणूक

जामखेड शहरासह तालुक्‍यात यापूर्वीही जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधी रुपयांना ‘टोपी’ घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये भाईचंद रायसोनी मल्टिस्टेट, शुभकल्याण मल्टिस्टेट, जामखेड मर्चंट बॅंक, एचबीएन डेरी, पॅनकार्ड क्‍लब, पल्स इंडिया लिमिटेड, परिवर्तन मल्टिस्टेट या संस्थांनी येथील गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे. यातील काही संस्थांनी थोडेफार पैसे परत केले आहेत. मात्र अद्यापही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक परत मिळावी, याच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदार आहेत.

जामखेड – जादा व्याजदराचे आमिष दाखवून परिवर्तन मल्टिस्टेटने जामखेड येथील 724 गुंतवणूकदारांना तब्बल 9 कोटींचा गंडा घातला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण, पाटोदा, माजलगाव शहर, तलवाडा, आष्टी व पिंपळनेर पाठोपाठ आता जामखेड पोलीस ठाण्यातही 26 संचालकांसह 37 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संचालक मंडळ मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे.

याबाबत मल्टिस्टेटचे खातेदार सचिन संजीवन देशपांडे (रा. कुंभारगल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजलगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या परिवर्तन मल्टिस्टे को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या जामखेड येथील शाखेमध्ये 724 खातेदारांनी 8 कोटी 78 लाख 2 हजार 500 रुपयांच्या मुदत ठेवी व इतर खातेदारांच्या ठेवीसह इतर रक्कम ठेवली होती. जादा व्याजदर व ठेवींच्या सुरक्षेची हमी देणारी जाहिरातबाजी करून संस्थेने सामान्यांचा विश्‍वास संपादन केला. मात्र ठेवीदारांनी गुंतवणूक केलेला पैसा मुदत उलटूनही परत देण्यास संस्था असमर्थ ठरली. मुदत संपूनही मल्टिस्टेटकडून ठेवी परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

पैशाची मागणी केली असता, सर्व पैसे मल्टिस्टेटच्या मुख्य शाखेत वर्ग करण्यात आल्याचे जामखेड येथील शाखेकडून सांगण्यात आले. यानंतर ठेवीदारांनी मुख्य शाखेशी संपर्क साधला असता, तुमचे पैसे इतर ठिकाणी गुंतवले असून, त्याची मुदत संपल्यानंतर ते देण्यात येतील, असे सांगण्यात आले. विश्‍वासाने ठेवीदारांनी मल्टिस्टेटमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. याबाबत ठेविदारांनी मल्टिस्टेटचे अध्यक्ष विजय आलझेंडे यांच्याकडेही तक्रारी केल्या. मात्र त्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही.

त्यानंतर ठेविदारांना आपला मोर्चा थेट मुख्य शाखेकडे वळविला. मात्र मागील सहा महिन्यांपासून अध्यक्ष आलझेंडे माजलगावमधून फरार असून, मुख्य शाखेला टाळे असल्याचे आढळून आले. त्यामुळे ठेविदार हादरले. चौकशी केली असता, मल्टिस्टेटचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार करून पळून गेल्याचे समजले. तसेच याबाबत बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण, पाटोदा, माजलगाव शहर, तलवाडा, आष्टी व पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याचे समजले. त्यानंतर आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्याने जामखेड पोलीस ठाण्यात सचिन संजीवन देशपांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अध्यक्ष भारत ऊर्फ विजय मरिबा आलझेंडे, उपाध्यक्ष संजय शर्मा, संचालक ज्योती शिवदास टाकणखार, शेख फरिदा सुलताना शेख मजहर, सुशीला भारत आलझेंडे, शुभांभी प्रकाश लोखंडे, उद्धव जाधव, अर्जुन होके, शाहाजीराव शिंदे, अनिता किशोर प्रधान, विनोदकुमार जाजू, धर्मराज भिसे, सुरेखा शशिकांत खडके, बळीराम चव्हाण, जयराम कांबळे, महेंद्र टाकणखार, बाबासाहेब ढगे, मालबाई नारायण पवार, सुमित्राबाई नारायण गुंदेकर, त्र्यंबक गायगवे, दिलीप जावळे, बंडू नाईकनवरे, बालाजी पानपट, सुरेखा वसंतराव भगत, पूनम नवनाथ धाईजे, प्रकाश लोखंडे, संतराम पवार, भारत मिसाळ, अशोक नाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी अनमोल भारत आलझेंडे, संदीप हिवाळे, अमित साठे, सुमित साठे, किसन मिसाळ, सदाशिव शेरकर, सतीश भिसे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)