गोळीबारप्रकरणी महिलेस अटक

बंदूक जप्त : मुख्य सूत्रधारासह साथीदार फरार

जामखेड – स्वातंत्र्यदिनादिनी भल्या पहाटे जामखेड शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेला बंदुकीसह अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारासह त्याचे साथीदार अजूनही फरार आहे. त्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि.15) जामखेड एसटी आगाराचे वाहक सुग्रीव गहिनाथ जायभाय (वय 43, रा. लोकमान्य शाळेशेजारी जामखेड) हा घरी कुटुंबीयांसमवेत असताना रात्री सचिन आजबे याचा फोन आला. त्याने नगर रस्त्यावरील एका धाब्यावर बोलवले. त्यामुळे फिर्यादी सुग्रीव जायभाय तेथे गेले. तेथे सचिन आजबेसह इतर अनोळखी चारजण होते. यावेळी सचिन आजबे याने सुग्रीव जायभाय यास तुला उसने दिलेले पैसे का देत नाहीस असे म्हणाला? त्यावेळी जायभाय हा वडील आजारी आहेत, नंतर देतो म्हणाला. सर्वजण बोलताबोलत शहरात निघाले.

त्यावेळी रात्रीचे 1.30 वाजले होते. यावेळी सचिन आजबे याने “”तू पैसे का देत नाही” म्हणून त्याने व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी चार जणांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर सचिन आजबे याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील पिस्तूलातून गोळी झाडली. ती पायाच्या मांडीवर लागून आरपार गेली. यानंतर ते सर्वजण पळून गेले.

जखमी सुग्रीव जायभाय याने मेव्हणा संदीप सांगळे यास फोन करून बोलावून घेतले. ते दोघे मोटारसायकलवरून खासगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालयात गेले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असा जबाब जामखेड पोलिसांत सुग्रीव जायभाय याने दिल्यावरून सचिन आजबे व इतर अनोळखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात जामखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत राणी संजय ढेपे (वय 28 रा. महारुळी. ता. जामखेड) हल्ली रा. मुंजोबा गल्ली, जामखेड या महिला आरोपीस पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी अटक केली. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सचिन आजबे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)