नगर: अपघाताचा बनाव करून चालकास लुटणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यास तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
आरोपी राजू सिकंदर शेख (वय-28 रा. केडगाव ता. जि.नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून गुन्ह्यात गेलेले सॅमसंग जे 2, वन प्लस व आपो कंपनीचे असे एकुण 4 मोबाईल 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व गोकुळ औताड यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहिती नुसार सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, रोहन खंडागळे, कारखिले, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, रवी सोनटक्के, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, राहुल सोळंके, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने राजु सिकंदर शेख याला केडगाव बायपास जवळ सापळा रचवून ताब्यात घेतले असून तोफखाना पोलिसांच्या चौकशीसाठी ताब्यात दिले आहे.
बालिकाअश्रम येथे स्विफ्ट डिझायर गाडीला अपघाताचा बनाव करत बिमलेस कुमार चांदोप्रसाद (रा.चंदनपुरा ता. पचलोवा जि.नालंदा, बिहार ह. मु. बालिकाआश्रम, नगर) यांनी लुटले होते. याबात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.