विखे सोमवारी, तर जगताप मंगळवारी अर्ज भरणार

नगर: भारतीय जनता पक्ष-शिवसेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील सोमवारी (ता. 1), तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप मंगळवारी (ता. 2) नगर दक्षिण मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी केली आहे.

डॉ. विखे पाटील हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांचे पुत्र आहेत. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉ. विखे पाटील यांना पक्षाने दक्षिणमधून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. आमदार अरुण जगताप यांचे ते पुत्र आहेत. डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप हे आपल्या समर्थकांसह मतदारसंघ पिंजून काढत आहेत. डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप या दोघांनाही राजकीय वारसा आहे. डॉ. विखे पाटील यांनी नगरच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून मोठी भूमिका बजावली होती. त्याच जोरावर विखे यांना जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करता आली. महापालिका निवडणुकीचा अनुभव देखील डॉ. विखे पाटील यांना आहे.

आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचा मोठा अनुभव आहे. शरद पवार यांनी नगर दक्षिणचे जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यात दोघेही उमेदवार तरुण आहेत. दोन्ही बाजूने राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे. या दोघा उमेदवारांनी अर्ज भरण्याची तारखा निश्‍चित केल्या आहेत. डॉ. विखे पाटील हे आपल्या राजकीय पक्षातील समर्थकांसह सोमवारी (ता. 1) अर्ज भरणार आहेत. आमदार संग्राम जगताप हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी (ता. 2) उमेदवारी अर्ज भरणार आहे. निवडणुकीच्या रिंगणातील समोरासमोर दोघांमध्ये लढत असून, ते एकापाठोपाठ अर्ज भरणार असल्याचे प्रशासनावर ताण येणार आहे. या दोन्ही दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निवडणूक कक्षाभोवती प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. त्यामुळे प्रशासनाचा कार्यकर्त्यांवर अंकुश असणार आहे.


मुंडे, महाजन आणि पवार
डॉ. सुजय विखे पाटील यांचा अर्ज भरताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे उपस्थित राहणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांचा अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)