जगनमोहन रेड्डी यांनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

अमरावती- विधानसभा निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. राज्यपाल ईएसएल नरसिंहा यांनी जगनमोहन रेड्डी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती.

जगनमोहन रेड्डींनी दुपारी सव्वाबारा वाजता तेलुगू भाषेतून शपथ घेतली. विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये वायएसआर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रेड्डींचा शपथविधी पार पडला. रेड्डींच्या मंत्रिमंडळातील अन्य आमदारांचा शपथविधी सात जून रोजी होण्याची शक्‍यता आहे.

जगनमोहन रेड्डींच्या शपथविधी सोहळ्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन, पुद्दुचेरीचे आरोग्यमंत्री मल्लादी कृष्णा राव उपस्थित होते. रेड्डी यांच्या मातोश्री आणि वायएसआर कॉंग्रेसच्या मानद अध्यक्षा वाय एस विजयम्माही मुलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या.

आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायुडू हे पहिले मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर कॉंग्रेसने आंध्रमधील 25 पैकी 22 जागा मिळवल्या आहेत.

दरम्यान, रेड्‌डी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)