जडेजा, मांजरेकर आणि वाद

भारतीय संघाचा माजी खेळाडू व सध्या टीव्हीवर समालोचन करणारा संजय मांजरेकर आणि भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांच्यात मैदानाबाहेर चांगलेच द्वंद्व पेटले. संजय मांजरेकर हे एक चांगले समालोचक आहेत. ते जितके चांगले समालोचक आहेत तितकेच ते कठोर टीकाकारही आहेत. समालोचन करताना ते अनेकदा खेळाडूंवर कठोर टीका करतात. त्यामुळेच अनेकदा ते स्वतःच टीकेचे धनी होतात.

सध्या चालू असलेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यावर त्यांनी महेंद्रसिंग धोनीवर टीका करताना धोनीच्या संथ खेळीमुळेच भारताचा पराभव झाला असा आरोप केला. धोनी हा संयमी खेळाडू असल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले पण जेंव्हा त्यांनी रवींद्र जडेजा याच्यावर टीका केली तेंव्हा मात्र जडेजाने त्याला प्रतिउत्तर दिले आणि वादास सुरवात झाली. भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्यात जेंव्हा कुलदीप यादवची पिटाई होत होती तेंव्हा समालोचन करणाऱ्या सचिन तेंडुलकरने जडेजाला संधी दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला संजय मांजरेकरने जडेजावर टीका करताना सरळ सरळ असे म्हटले की जडेजा हा तुकड्या तुकड्यामध्ये प्रदर्शन करणारा खेळाडू आहे आपण अशा खेळाडूचे कधीच फॅन होऊ शकत नाही. ही टीका जडेजाच्या जिव्हारी लागली त्याने लगेच ट्विटरवरुन मांजरेकर यांना उत्तर दिले. त्यात त्याने असे म्हटले की, मी तुमच्यापेक्षा डबल क्रिकेट खेळलोय आणि खेळतोय क्रिकेटमध्ये ज्यांनी उपलब्धी मिळवली त्यांचा सन्मान करायला शिका मी आतापर्यंत तुमची खुप बकवास ऐकत आलो आहे आता तुमची बकवास बंद करा.

जडेजाच्या या ट्विटनंतर क्रिकेट रसिकांनी जडेजाला पाठिंबा देत संजय मांजरेकर यांना ट्रोल करण्यास सुरवात केली. जडेजाने मांजरेकर यांना जे उत्तर दिले ते योग्यच आहे कारण वर्ल्डकप सारख्या महत्वाच्या स्पर्धेत आपल्याच खेळाडूंवर टीका करून मांजरेकर खेळाडूंचे खच्चीकरण करीत आहेत. दुसऱ्या देशाचे समालोचक समालोचन करताना त्यांच्या खेळाडूंवर टीका करणे टाळतात. जडेजाने जे ट्विट केले आहे ते योग्यच आहे कारण, जर मांजरेकर यांची कारकीर्द पाहिली तर ती दैदिप्यमान अशी नाही अतिशय साधारण अशी त्यांची आकडेवारी आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी भारताला एकही सामना जिंकून दिला नाही. आज धोनीच्या संथ खेळीवर टीका करणाऱ्या मांजरेकर यांचा एकदिवसीय कारकिर्दीचा स्ट्राईक रेट पन्नासच्या आसपास आहे तर सरासरी 33.23 इतकी साधारण आहे. परदेशात तर ही सरासरी 28.52 इतकी मामुली आहे संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी फक्त एकच शतक काढले आहे. एकदिवसीय सामने ते कसोटी प्रमाणेच खेळले असायचे. एकदिवसीय सामन्यात धावा काढण्यापेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याकडेच त्यांचा कल होता. संघहितापेक्षा स्वतःच्या जागेचीच त्यांना चिंता होती.

आता जेंव्हा ते समालोचन करीत आहेत तेंव्हा मात्र ते आताच्या खेळाडूंनी कमी चेंडूत जास्त धावा काढाव्यात संघहिताकडे लक्ष द्यावे असे अनाहूत सल्ले देत आहेत. संजय मांजरेकर यांनी खेळाडूंवर जरूर टीका करावी पण ती टीका खेळाडूंच्या जिव्हारी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. मागे जेंव्हा सचिन तेंडुलकर यांच्या धावा होत नव्हत्या तेंव्हा याच मांजरेकर यांनी सचिन तेंडुलकर यांच्यावर टीका करीत सचिन तेंडुलकर यांना संघातून वगळण्याची मागणी केली होती. सचिन सारख्या क्रिकेटमधील देव माणसाला देखील मांजरेकर यांनी सोडले नाही सचिनने देखील नंतर आपल्या बॅटनेच मांजरेकर यांना उत्तर दिले होते, पण आताचे खेळाडू मात्र मांजरेकर यांची बकवास ऐकून घेणारे नसून त्यांना प्रतिउत्तर देणारे आहेत याचे भान मांजरेकर यांनी ठेवावे.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)