प्रचाराबरोबर गुन्ह्यांचीही जाहिरात करणे बंधनकारक 

संग्रहित छायाचित्र

नागपूर – लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्या असून उमेदवारांकडून जोरात प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, यंदा मात्र उमेदवारांना आपल्या गुणांच्या प्रचाराबरोबर अवगुणांचाही प्रचार करावा लागणार आहे. म्हणजेच निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपाच्या सूचना उमेदवारांना दिल्या जात असल्याचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी सांगितले.

निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी लपविता येणार नाही. तसेच उमेदवारांना प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून संबंधित माहितीच्या जाहिराती प्रसिद्धीस द्याव्या लागतील. याशिवाय, राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयीची माहिती त्यांच्या वेबसाईटस्‌वरून द्यावी लागणार आहे. गुन्ह्यांची जाहिरात देतानाही चांगला खप असलेल्या दैनिकांत आणि तेही १२ चा फॉन्ट असलेली जाहिरात प्रसिद्ध करण्याची अट निवडणूक आयोगाने टाकली असल्याचे फडके यांनी सांगितले.

… तर कारवाई होऊ शकते 
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्राबरोबर आपली गुन्ह्यांची जाहिरातही करावी लागणार आहे. शिवाय प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून संबंधित माहितीच्या जाहिराती प्रसिद्धीस द्याव्या लागतील. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची कात्रणे उमेदवारांना सादर करावी लागतील. तर पक्षांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या उमेदवारांची संख्या नमूद करावी लागेल. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसणाऱ्या उमेदवारांना त्याविषयीचा उल्लेख करावा लागेल.  तसे न करणाऱ्या पक्षांची मान्यता काढून घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)