बंगळुरु- आय मॉनेटरी ऍडवायझरी (आयएमए) नावाने इस्लामिक कंपनी चालविणारा मोहम्मद मन्सूर खान लोकांची फसवणूक करुन परदेशात फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गुंतवणूक करुन रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून मन्सूर खान याने लोकांकडून पैसे लाटले होते. मन्सूरने मुस्लिम समुदायातील लोकांना लक्ष्य करत तब्बल 1 हजार 500 कोटी रूपये जमवले होते. मिळालेल्या माहितीनुसार मन्सूरने त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पळ ठोकला असून सध्या बंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
मन्सूरविरोधात पहिली तक्रार त्याचा भागीदार खालिद अहमद याने केली होती. मन्सूर खानवर साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार खालिद यांनी केली होती. त्यानंतर मन्सूर खानची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाली. त्यात आत्महत्या करण्याची धमकी मन्सूर खानने दिली होती. या ऑडिओ क्लीपनंतर मन्सूर विरोधात लोकांनी तक्रारी केल्या होत्या.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार प्राप्त झाल्यानंतर मन्सूर खान दुबईसाठी रवाना झाला होता. यानंतर आयएमएच्या सात संचालकांना अटक केली असून मन्सूर खान याची कार जप्त करण्यात आली आहे. मन्सूर खानची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 2006 मध्ये आयएमए या गुंतवणूक कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून लोकांना विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करुन 14 ते 18 टक्के रिटर्न देण्याचं आमिष दाखविण्यात आलं होतं. लोकांनीही योजनेला बळी पडत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती.