ब्लास्टर्सला चकवून आगेकूच करण्यास नॉर्थइस्ट उत्सुक

गुवाहाटी – हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीची येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. ही लढत जिंकून गुणतक्त्‌यात आगेकूच करण्यास नॉर्थइस्ट उत्सुक आहे.

नॉर्थइस्टचे सहा सामन्यांतून 11 गुण असून गुणतक्त्‌यात त्यांचा पाचवा क्रमांक आहे. जिंकल्यास त्यांना आगेकूच करता येईल. मुख्य म्हणजे त्यांचा एक सामना कमी झाला आहे. फक्त त्यांच्यासमोर एक अडचण आहे. आतापर्यंतचे तिन्ही सामने नॉर्थइस्टने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर जिंकले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर जिंकता येत नाही असा अपशकून मोडण्याचा त्यांचा या सामन्यातून निर्धार असनार आहे.

नॉर्थइस्टची बरीच मदार बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर असेल. त्याने यंदा संघाच्या एकून गोलच्या पन्नास टक्‍यांपेक्षा जास्त गोल केले आहेत. नायजेरियाच्या या स्ट्रायकरने ज्या सामन्यात गोल केला त्या सामन्यात नॉर्थइस्ट एकदा सुद्धा हरलेला नाही.

प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांच्या संघाची ताकद बचावपटू मिस्लाव कोमोर्स्की याच्या पुनरागमनामुळे सुद्धा वाढली आहे. एका परदेशी खेळाडूला मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तो उर्वरीत मोसमास मुकणार असल्याचे त्यांनी सांगितले. या खेळाडूचे नाव उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यांनी सांगितले की, आमचा एक परदेशी खेळाडू जायबंदी झाला आहे. तो यापुढे कदाचित खेळू शकणार नाही, पण मी त्याचे नाव जाहीर करणार नाही. याचे कारण त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला थोडा फायदा मिळू शकेल. ओगबेचे याला सुद्धा किरकोळ दुखापत झाली होती. काही भारतीय खेळाडू सुद्धा जायबंदी आहेत, पण शेवटी दुखापती हा फुटबॉलचा एक भाग असतो.

ब्लास्टर्सने सलामीला एटीकेला हरविले. तेव्हापासून मात्र त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. प्रशिक्षक डेव्हिड जेम्स हे संघाला विजयी मार्गावर आणण्यासाठी झगडत आहेत. त्यातच ब्लास्टरने घरच्या मैदानावर मागील दोन सामने गमावले आहेत. बेंगळुरू एफसी आणि एफसी गोवा यांच्याकडून ते हरले. आधीच्या कोणत्याही मोसमाप्रमाणे ब्लास्टर्सचा संघ गोल करण्यासाठी चाचपडतो आहे. याशिवाय त्यांना गोल करण्याच्या फारशा संधी सुद्धा निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यानंतरही जेम्स यांनी ठाम आशा व्यक्त केली.

ते म्हणाले की, गोव्याविरुद्ध एका सामन्याचा अपवाद सोडल्यास आमची कामगिरी समाधानकारक झाली आहे. गोव्याचा संघ चांगला आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध पुरेशी चांगली कामगिरी करू शकलो नाहीत. इतर संघ तुमच्यापेक्षा चांगले आहेत, हे तुम्हाला काही वेळा मान्य करावे लागते. इतर सहा सामन्यांत आम्ही उत्तम खेळ केला. यात बेंगळुरूविरुद्धच्या लढतीचाही समावेश होतो. आम्हाला सामने नेहमीच जिंकायचे असतात. आम्हाला बाद फेरीला पात्र ठरायचे आहे आणि आयएसएल जिंकायची आहे. आमचे तीन गुणांचे लक्ष्य आहे.

यंदाच्या मोसमात अनास एडाथोडिका याला पुरेशी संधी मिळालेली नाही. गोव्याविरुद्ध तो स्टार्टिंग लाईन-अपमध्ये होता, पण त्याची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. ओगबेचे आणि फेडेरिको गॅलेगो यांच्यारख्या दमदार प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी जेम्स सर्वस्वी भारतीय खेळाडूंची फळी खेळविणार का हे पाहावे लागेल.

सैमीनलेन डुंगल आणि हालीचरण नर्झारी यांच्यासाठी ही लढत म्हणजे पूर्वीच्या घरच्या मैदानावरील पुनरागमन असेल. ते पूर्वी नॉर्थइस्टकडे होते. शात्तोरी म्हणाले की, ब्लास्टर्सच्या खेळाचा अंदाज घेणे अवघड असते. ते संधीचा फायदा उठवितात आणि हे त्यांचे बलस्थान आहे. त्यासाठी त्यांच्याकडे डुंगल आणि हालीचरण यांच्यासारखे खेळाडू आहेत, जे पूर्वी आमच्याकडे होते. ते ड्रीबलिंग चांगले करतात. ते दिर्घ अंतरावर चेंडू मारतात. त्यांच्या बचाव फळीत काही त्रुटी आहेत, पण मी त्याविषयी उल्लेख करणार नाही. मी त्या संघाचा अभ्यास चांगला केला आहे.

नॉर्थइस्ट घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविणार का आणि पुन्हा पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविणार का की ब्लास्टर्स नितांत गरज असलेले तीन गुण मिळविणार याची उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)