ISL Football : चेन्नईयीनविरुद्ध आज नॉर्थईस्टची लढत

गुवाहाटी  -नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होईल. येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर हा सामना होईल. प्ले-ऑफसाठी पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या मोहीमेला गती देण्याचा नॉर्थईस्टचा प्रयत्न असेल.

एल्को शात्तोरी प्रशिक्षक असलेला नॉर्थईस्ट संघ 12 सामन्यांतून 20 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे केवळ सहा सामने बाकी असून जमशेदपूर एफसी आणि एटीके हे दोन संघ त्यांचा पाठलाग करीत आहेत. अशावेळी तळात असलेल्या चेन्नईयीनविरुद्ध विजय नोंदविणे नॉर्थईस्टकरीता महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॉर्थईस्टचा दिर्घ ब्रेकपूर्वीचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरतो. चार सामन्यांत त्यांना एकही विजय मिळविता आला नाही. मागील सामन्यात एफसी गोवा संघाविरुद्ध 1-5 असा पराभव त्यांना पत्करावा लागला. ब्रेकनंतर मात्र शात्तोरी यांचा संघ ताजातवाना झाला असून मैदानावर उतरण्यास सज्ज आहे. ग्रीसचा फॉरवर्ड पॅनागीओटीस ट्रीयाडीस आणि शौविक घोष असे नवे खेळाडू त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे संघ भक्कम झाला आहे.

शात्तोरी यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविले आहे. आम्ही कसून सरावाच्या जोरावर ही वाटचाल केली आहे. खेळाडूंना एकमेकांची शैली जाणून घेण्यास वेळ मिळाला. मग लीगला ब्रेक मिळाला. त्या कालावधीत आम्ही पुढील टप्यासाठी योजना आखण्यासाठी प्रयत्नशील होतो. गेल्या दोन आठवड्यांत आम्ही तयारी सुरु केली. आम्ही मित्रत्वाचे दोन सामने खेळलो, पण आमचे प्रतिस्पर्धी कमकुवत होते. मला हे पसंत पडले नाही, कारण अशावेळी संघाचा दर्जा समजून घेणे प्रशिक्षकांसाठी अवघड ठरते.

घरच्या मैदानावर नॉर्थईस्टला केवळ एक विजय मिळविता आला असून चार बरोबरी व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. नॉर्थईस्टची मदार पुन्हा बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर असेल. त्याने नऊ गोल नोंदविले आहेत. चेन्नईयीनच्या कमकुवत संघाविरुद्ध त्याच्याकडून आशा असेल. चेन्नईयीनचा बचाव स्पर्धेत सर्वांत खराब ठरला असून 12 सामन्यांत त्यांना 24 गोल पत्करावे लागले आहेत.

गतविजेत्या चेन्नईयीनला आतापर्यंत एकच विजय मिळविता आला आहे. आता केवळ थोडी प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना खेळावे लागेल. असे असले तरी प्रशिक्षक जॉन ग्रेगरी संघाला शक्‍य तेवढ्या वरचा क्रमांक मिळावा म्हणून प्रयत्नशील राहतील. चेन्नईयीन संघ एएफसी करंडकासाठी पात्र ठरला आहे. त्या मोहीमेसाठी लय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
ग्रेगरी यांना ब्रेक तसेच नव्या खेळाडूंमुळे संघाचे दैव पालटण्याची आशा असेल.

सी. के. विनीत आणि हालीचरण नर्झारी या दोन खेळाडूंना केरळा ब्लास्टर्सकडून लोनवर आणण्यात आले आहे. ही जोडी चेन्नईयीनच्या खेळात जान निर्माण करू शकते. चेन्नईयीन केवळ चार परदेशी खेळाडू खेळविण्याची शक्‍यता इंग्लंडच्या ग्रेगरी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही उर्वरीत लिगमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू घेऊन प्रयोग करण्याची शक्‍यता आहे. आम्ही ब्लास्टर्सकडून दोन धडाकेबाज भारतीय खेळाडू मिळविले आहेत.

त्यांच्यामुळे परदेशी खेळाडूंचा कोटा वाढणार नाही. त्यांचा दर्जा पाहिल्यास त्यांना खेळविण्याचा निर्णय घेण्यासाठी मला बुद्धी पणाला लावण्याची गरज नाही. या दोन्ही खेळाडूंना परिस्थिती तसेच लिगचा अनुभव आहे. ते खेळण्यास सुसज्ज आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)