आयएसएल फुटबॉल स्पर्धा : एटीकेच्या विजयात व्हिएराची चमकदार कामगिरी

कोलकता – ब्राझीलचा मध्यरक्षक गेर्सन व्हिएरा याने हेडिंगद्वारे अप्रतिम गोल केल्यामुळे एटीकेने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एफसी पुणे सिटीचा 1-0 असा पराभव केला. व्हिएराने सामना संपायला आठ मिनिटे बाकी असताना गोल करताना एटीकेला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे पुण्याची विजयाची प्रतिक्षा आणखिन वाढली आहे.

सामन्यात गोल करण्याचा पहिला प्रयत्न दुसऱ्या मिनिटाला एटीकेने केला. पुण्याच्या मार्टिन डियाझने अडविलेला चेंडू प्रोणय हल्दरपाशी गेला. बॉक्‍सच्या उजवीकडून प्रोणयने चेंडू गोलच्या दिशेने मारला, मात्र, कमलजीत सिंगने बचाव गोल होउ दिला नाही. सहाव्या मिनिटाला एटीकेला फ्री किक मिळाली. 25 यार्डावरून मॅन्यूएल लॅंझरॉतने फटका मारला, पण त्याने गरजेपेक्षा जास्त जोर लावल्याने संधी वाया गेली.

चार मिनिटांनी लॅंझरॉतने सहकारी बलवंत सिंग याची घोडदौड हेरली आणि दिर्घ पास दिला, पण यावेळी कमलजीतने पुढे सरसावत चेंडूवर ताबा मिळविला. एटीकेला 12व्या मिनिटाला आणखी एक फ्री किक मिळाली. लॅंझरॉतने ती घेतली, पण त्याचा कोणताच सहकारी योग्य स्थितीत नव्हता. परिणामी कमलजीतने चेंडू ताब्यात घेतला. 18व्या मिनिटाला लॅंझरॉतने सेट-पीसवर प्रयत्न केला. यावेळी त्याला फटका गोलपोस्टला लागला. पुण्याने 20व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला.

आशिक कुरुनियान याने डावीकडून आगेकूच करीत मारलेला फटका एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने डावीकडे झेपावत अडविला. दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला एटीकेच्या रिकी लल्लावमावमा याने डावीकडून प्रयत्न केला, पण चेंडू कमलजीतच्या ग्लोव्हजला चाटून बाहेर गेला. चार मिनिटांनी लॅंझरॉतने उजवीकडून एव्हर्टन सॅंटोसला संधी दिली, पण फिनिशिंगअभावी ती हुकली.

तर, 58व्या मिनिटाला कोमल थातल याने हेडिंगवर लॅंझरॉतला चेंडू दिला, पण पुणे सिटीच्या खेळाडूंच्या भिंतीला लागून तो ब्लॉक झाला. 64व्या मिनिटाला व्हिएराने मारलेला फटका क्रॉसबारवरून गेला. 68व्या मिनिटाला पुण्याच्या रॉबिन सिंगने प्रयत्न केला, पण अरींदमने चेंडू आरामात अडविला. यावेळी एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत जाण्याची शक्‍यता असतानाच खेळ संपायला आठ मिनिटे बाकी असताना गेर्सन व्हिएराने गोल केला. मॅन्यूएल लॅंझरॉतने टाचेचा कल्पक वापर करीत जयेश राणेला पास दिला. राणेने व्हिएराच्या दिशेने चेंडू मारला. मग व्हिएराने अचूक हेडिंग केले आणि एफसी पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग यावेळी चेंडू पकडू शकला नाही.

एटीकेने सात सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 10 गुण झाले. त्यांनी केरळा ब्लास्टर्सला (6 सामन्यांतून 7 गुण) मागे टाकत एक क्रमांक प्रगती करून सहावे स्थान गाठले. पुणे सिटीला सात सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला. दोन बरोबरींसह दोन गुण मिळवून हा संघ शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. पुण्याला भेदक चाली रचता आल्या नाहीत. मार्सेलिनीयो व एमिलीयानो अल्फारो यांच्या गैरहजेरीत त्यांच्या आक्रमणातील जान निघून गेली होती.

निकाल : एटीके : 1 (गेर्सन व्हिएरा 82) विजयी विरुद्ध एफसी पुणे सिटी : 0


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)