इंडीयन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा 2018 : एटीकेचा चेन्नईयीनवर थरारक विजय

File photo

चेन्नई : हिरो इंडियन सुपर लीगमध्ये माजी विजेत्या एटीकेने रविवारी चेन्नईयीन एफसीवर 3-2 अशी मात केली. एटीकेला दोन पेनल्टींचा लाभ झाला. दोन्ही वेळा शैलीदार स्ट्रायकर मॅन्यूएल लॅंझरॉतने या संधी साधल्या. दोन मिनिटे बाकी असताना पिछाडी कमी केलेल्या चेन्नईयीनला घरच्या मैदानावर अखेरीस पेनल्टीच भोवल्या.
चेन्नईयीनने चांगली सुरुवात केली होती. मात्र, पहिला गोल करण्यात एटीकेला यश मिळाले. हितेश शर्माने पास देताच

जयेशने दोन पावले पुढे जात 26 यार्डावरून जोरदार फटका मारला. त्या फटक्‍याने चेन्नईयीनचा गोलरक्षक संजीबन घोष याला कोणतीही संधी मिळाली नाही. आणि एटीकेचे खाते उघडले. पहिल्या गोलच्या केवळ दहाच मिनिटात चेन्नईयीनने गोल करत बरोबरी साधली. इसाकने मुसंडी मारत डावीकडून मैल्सन आल्वेसला पास दिला. मैल्सनने चेंडू नियंत्रीत करीत थोई सिंगला पास दिला. थोईने मैदानालगत फटका मारत नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यावेळी एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याचा अंदाज चुकला आणि चेन्नईयीनचे खात्ये उघडले.

-Ads-

पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात बरोबरी झाल्यामुळे चुरस शिगेला पोचली होती. मध्यंतरास दोन मिनिटे बाकी असताना एटीकेच्या हितेशने बॉक्‍समध्ये प्रवेश करीत उजवीकडे लॅंझरॉतला पास दिला. लॅंझरॉतला पुरेसा वेळ होता आणि त्याने चेंडू नेटच्या दिशेने व्यवस्थित मारला. त्याचवेळी बचावाच्या प्रयत्नात एली साबियाचा हात चेंडूला लागला. त्यामुळे पंच ए. रोवन यांनी एटीकेला पेनल्टी बहाल केली. त्यावर लॅंझरॉतने संजीबनचा अंदाज चुकवित चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारला.

एटीकेला आणखी एका पेनल्टीचा लाभ झाला. उजवीकडून लॅंझरॉतने पलिकडील बाजूला जॉन जॉन्सन याला पास दिला. जॉन्सनने आक्रमक पवित्रा घेत चेंडू नेटच्या दिशेने हेडिंग केला. चेन्नईयीनच्या कार्लोस सालोमने चेंडू ब्लॉक केला. त्यावेळी थोडी चुरस झाली. कार्लोसला फाऊल दिल्याचे वाटले आणि त्याने चेंडू हातात झेलला, पण हीच घोडचूक ठरली. त्यामुळे एटीकेला दुसरी पेनल्टी मिळाली. लालदीना रेंथलेई आणि कार्लोसने पंचांशी वाद घातला. त्यामुळे यलो कार्ड दाखविले गेले. मग लॅंझरॉतने पहिल्या वेळी मारला तसाच अचूक फटका मारत लक्ष्य साधले. त्यानंतर इसाकने गोल केला, पण अंतिम निकालात फरक पडला नाही. त्यामुळे चेन्नईयीनला पराभवाचा सामना करावा लागला.

एटीकेने 10 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. मुंबई सिटी एफसीला मागे टाकत त्यांनी पाचवे स्थान गाठले. चेन्नईयीनला दहा सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण व आठवा क्रमांक कायम राहिला.

निकाल : चेन्नईयीन एफसी : 2 (थोई सिंग 24, इसाक वनमाल्साव्मा 88) पराभूत विरुद्ध एटीके ः 3 (जयेश राणे 14, मॅन्युएल लॅंझरॉत 44-पेनल्टी, 80-पेनल्टी).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)