इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई-एटीके सामना गोलशून्य बरोबरीत

मुंबई – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये सलग चार विजय नोंदविण्याची मुंबईची संधी हुकली. शनिवारी एटीकेविरुद्ध घरच्या मैदानावर मुंबईला गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले. दोन्ही संघ उत्तम चालींना फिनीशींगची जोड देऊ शकले नाहीत. त्यामुळे मध्यंतराची कोंडी निर्धारीत वेळेतही सुटू शकली नाही. मुंबईने सलग तीन सामने जिंकले होते, पण मुंबई फुटबॉल एरीनावर ते सुमारे पाच हजार प्रेक्षकांना निर्णायक विजयाची पर्वणी देऊ शकले नाहीत.

सामन्यात गोल झळकाविण्याचा पहिला प्रयत्न दुसऱ्या मिनिटाला मुंबईने केला. सेहनाज सिंगला 30 यार्डावर चेंडू मिळाला, पण त्याचा फटका नेटवरून बाहेर गेला. अन्यथा एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य चेंडू अडविण्यासाठी योग्य स्थितीत होता. दोन मिनिटांनी एटीकेकडून मॅन्यूएल लॅंझरॉतने प्रयत्न केला, पण 30 यार्डावरून फ्री किकवर त्याने मारलेला फटका कमकुवत असल्यामुळे मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग सहज बचाव करू शकला.

सेहनाजने 25 यार्ड अंतरावर रफाएल बॅस्तोसकडून पास मिळताच फटका मारला, पण त्यात ताकद नव्हती. 13व्या मिनिटाला अन्वर अलीने एव्हर्टन सॅंटोसला पाडले. त्यामुळे एटीकेला फ्री किक मिळाली, पण त्यावर सॅंटोसने मारलेला चेंडू अमरींदरने पंच करीत बाहेर घालविला. पुढच्याच मिनिटाला सॅंटोसला उजवीकडून चेंडू मिळाला. त्याने बॉक्‍समध्ये प्रवेश करीत कोमल थातल याला चेंडू दिला, पण या संधीला फिनिशिंगची जोड मिळू शकली नाही.

20व्या मिनिटाला मध्य रेषेपाशी गेर्सन व्हिएराला पास मिळाला. त्याने लॅंझरॉतकडे चेंडू सोपविला, पण ही चाल सुद्धा यशस्वी ठरू शकली नाही. 37व्या मिनिटाला अन्वर अलीने कॉर्नरवर हेडींग केलेला चेंडू शुभाशिष बोस याच्यापाशी गेला. चेंडू वेगाने आल्यामुळे बोस अचूकता साधू शकला नाही. त्यामुळे त्याचा फटका नेटवरून गेला.

दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला मुंबईला सर्वोत्तम संधी मिळाली होती. अरनॉल्ड इसोको याने बॅस्तोसला बॉक्‍समध्ये पास दिला. बॅस्तोसने हेडिंग केलेला चेंडू पाऊलो मॅचादो याच्यापाशी गेला. मॅचादोने जोरदार फटका मारला, पण एटीकेच्या गेर्सन व्हिएराने चपळाईने झेप टाकत चेंडू ब्लॉक केला. चेंडू बाहेर गेल्याने मुंबईला कॉर्नर मिळाला, पण त्यावर काही घडू शकले नाही.

बॅस्तोसने 52व्या मिनिटाला डावीकडून मुसंडी मारत प्रयत्न केला, पण गरजेपेक्षा जास्त ताकद लावल्यामुळे चेंडू बाहेर गेला. पुढच्याच मिनिटाला मुंबईने प्रतिआक्रमण रचले. मॅचादोने पास देण्याचा प्रयत्न केला, पण डावीकडे सहकारी नसल्यामुळे अरिंदमने चेंडू आरामात अडविला. 60व्या मिनिटाला सेहनाजने इसोकोला पास दिला, पण इसोकोने अरिंदमच्या अगदी जवळून चेंडू मारला. त्यामुळे ही संधी सुद्धा वाया गेली.

एटीकेला 64व्या मिनिटाला जोरदार संधी मिळाली. फ्री किकवर व्हिएराला चेंडू मिळाला. त्याचे टायमिंग चुकले नसते तर हमखास गोल झाला असता. 75व्या मिनिटाला लॅंझरॉतच्या फ्री किकवर बलवंत सिंगने हेडिंग केले, पण तो पुरेसी ताकज लावू शकला नाही.

76व्या मिनिटाला एटीकेला अरिंदमने तारले. बोसने 40 यार्डावरून मारलेला फटका अरिंदमने अडविला.
मुंबईने आठ सामन्यांतून दुसरी बरोबरी साधली असून चार विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. त्यांचे चौथे स्थान कायम राहिले. एटीकेने आठ सामन्यांतून दुसरी बरोबरी साधली असून तीन विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले. एफसी गोवा 16 गुण व सरस गोलफरकामुळे (8) आघाडीवर आहे. बेंगळुरू 16 गुण व सात गोलफरकासह दुसऱ्या, तर नॉर्थइस्ट युनायटेड 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)