हिरो इंडियन सुपर लीग : बेंगळुरू अंतिम फेरीत दाखल

बेंगळुरू – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचे कडवे आव्हान 3-0 असे परतावून लावले. एकूण 4-2 अशा ऍग्रीगेटच्या जोरावर बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली. बेंगळुरूने सलग दुसऱ्या मोसमात ही कामगिरी केली आहे. व्हेनेझुएलाचा मिकू, डिमास डेल्गाडो आणि कर्णधार सुनील छेत्री यांनी दुसऱ्या सत्रात गोल केले.

नॉर्थईस्ट युनायटेडने पाच मोसमांत प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. गुवाहाटीतील सामन्यात त्यांचा हुकमी स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे जायबंदी झाला. त्यामुळे तो ही लढत खेळू शकला नाही. त्यातच दुसरा महत्त्वाचा खेळाडू फेडेरीको गॅलेगो याला 60व्या मिनिटाला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. याचा नॉर्थइस्टच्या संघावर परिणाम झाला, पण त्यांची एकूण वाटचाल निष्ठावान चाहत्यांसाठी कौतुकास्पद ठरली.

-Ads-

श्री कंठीरवा स्टेडियमवर बेंगळूरूने दुसऱ्या सत्राच्या अंतिम टप्यात विजय साकार केला. घरच्या मैदानावर पूर्वार्धात असंख्य प्रयत्न केलेल्या बेंगळुरूसाठी मध्यंतराची गोलशून्य बरोबरी निराशाजनक ठरली होती. बेंगळुरूची खाते उघडण्याची प्रतीक्षा अखेर 72व्या मिनिटाला संपुष्टात आली. उजवीकडून हरमनज्योत खाब्रा याने रचलेली चाल झिस्का हर्नांडेझ व उदांता सिंग यांनी पुढे नेली. उदांताच्या अप्रतिम पासवर मिकूने गोल केला.

बेंगळुरूने पहिल्या टप्यातील सामन्यात गुवाहाटीत एक गोल केला होता. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील गोलमुळे म्हणजे अवे गोलमुळे बेंगळुरूसाठी एकमेव गोलच्या फरकाने विजय पुरेसा ठरला असता, पण त्यावर समाधान न मानता बेंगळुरूने धडाकेबाज खेळ केला. तीन मिनिटे बाकी असताना कॉर्नरवर उदांताला चेंडू मिळाला. त्याने डावीकडून मुसंडी मारली. त्याचा चेंडू नॉर्थईस्टचा गोलरक्षक नवीन कुमार याच्या हाताला लागून गोलपोस्टवर आदळला. हा चेंडू आपल्या दिशेने येताच डेल्गाडोने संधी साधली. अखेरच्या मिनिटाला छेत्री व मिकू यांनी चाल रचत आगेकूच केली. यातून छेत्रीने स्कोअरशीटवर आपले नाव कोरले.

बेंगळुरूने सुरवात चांगली करीत चेंडूवर ताबा ठेवला. त्यांनी काही आक्रमक चाली रचल्या. कर्णधार सुनील छेत्रीला डावीकडून मोकळीक देण्यात आली. त्याने चौथ्या मिनिटाला मारलेला फटका ब्लॉक होऊन चेंडू बाहेर गेल्याने कॉर्नर मिळाला, पण त्यावर विशेष काही घडले नाही. सहाव्या मिनिटाला निशू कुमारने प्रयत्न केला. आठव्या मिनिटाला नॉर्थईस्टने प्रयत्न केला. फेडेरीको गॅलेगोने डिमास डेल्गाडोला चकवून चेंडू ताब्यात घेतला. नेटच्या दिशेने आगेकूच करीत त्याने जुआन मॅस्कीयाला उजवीकडे पास दिला. संधी कठीण असूनही मॅस्कीयाने प्रयत्न केला, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याने चपळाईने चेंडू अडविला.

नवव्या मिनिटाला नॉर्थईस्टच्या क्षेत्रातून चेंडू मिळवित बेंगळुरूने चाल रचत झिस्को हर्नांडेझला बॉक्‍समध्ये डावीकडे पास दिला. त्याने मारलेला फटका मात्र स्वैर होता. 13व्या मिनिटाला किगन परेराने झिस्कोला पाडल्यामुळे बेंगळुरूला बॉक्‍सजवळ फ्री किक देण्यात आली. त्यावर फिनिशिंग होऊ शकले नाही.

गॅलेगोने 31व्या मिनिटाला केलेला प्रयत्न वाया गेला. मग 33व्या मिनिटाला मिकूने तिसऱ्या प्रयत्नातही निराशाच केली. उजवीकडून आगेकूच करताना त्याला केवळ पवनला चकवायचे होते, पण त्याचा फटका थेट पवनकडे गेला त्यामुळे त्यांचा गोल करण्याचा प्रयत्न हुकला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)