‘आयएसएल’मधे यंदा झाले अनेक चढ उतार

गत वर्षीचे विजेते यंदा तळाच्या स्थानी

मुंबई – हिरो इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) पाचवा मोसम संपला आहे. बेंगळुरू एफसीने विजेतेपद मिळविले, तर, एफसी गोवाच्या संघाने यंदा जबरदस्त कामगिरी करत स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान मिळवला असून गतविजेता चेन्नईयीन एफसी अखेरच्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे यंदाच्या वर्षी स्पर्धेत अनेक चढ उतार पहायला मिळाले.

गेल्या मोसमात अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूने अंतिम फेरी गाठली. यावेळी कार्लेस कुआद्रात यांच्याकडे सुत्रे आल्यानंतर सरस कामगिरी अपेक्षित होती. त्यासाठी जेतेपदच आवश्‍यक होते. कुआद्रात यांनी मुळातच आकर्षक असलेली शैली आणखी पूरक बनविली. मैदानावर आणखी सकारात्मक खेळ करणारा संघ त्यांनी बांधला. संघभावना, लढाऊ वृत्ती आणि गुणवत्तेच्या जोरावर बेंगळुरूचा संघ बहरला. एफसी गोवाला हरवून त्यांनी थाटातच जेतेपद मिळविले. तर, भारतीय फुटबॉलमध्ये गोव्याच्या संघांनी नेहमीच लौकीक निर्माण केला आहे.

एफसी गोवाने दोन मोसमांच्या कालावधीत आपली खास शैली निर्माण केली. प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी नव्या मोसमासाठी बहुतांश खेळाडू कायम राखले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी स्पॅनीश शैली आत्मसात केली. ढिसाळ बचाव हीच मागील मोसमातील उणीव होती. त्यामुळे एफसी गोवाची पिछेहाट होत होती.

लॉबेरा यांनी ही त्रुटी दूर केली. त्यासाठी मौर्तडा फॉल आणि कार्लोस पेना अशी जोडी जमविण्यात आली. मंदार राव देसाई याला लेफ्ट-बॅक बनविण्याचा धाडसी निर्णयही घेण्यात आला. ह्युगो बौमौस याला बदली खेळाडू म्हणून परिणामकारक पद्धतीने वापरण्यास चांगली फळे मिळाली. गोवा अंतिम फेरी कमी पडला असेल पण त्यांच्यासाठी हा मोसम संस्मरणीय ठरला.

मुंबईच्या बाद फेरीतील वाटचालीत परदेशी खेळाडूंचे योगदान मोठे होते. संथ सुरवातीनंतर खेळाडूंनी खेळ उंचावला आणि बाद फेरीत प्रवेश केला. या वाटचालीत एफसी गोवाविरुद्ध झालेला 1-5 असा पराभव निर्णायक ठरला. त्यानंतरच मुंबईचे खेळाडू खडबडून जागे झाले. संघाचा गाभा कायम राखला तर या संघाचे भवितव्य उज्ज्वल असेल.

एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थइस्टला खेळाडूंच्या दुखापती आणि निलंबनामुळे झगडावे लागले. खास करून बचावात त्यांना फटका बसला. यानंतरही संघभावना आणि उपलब्ध खेळाडूंच्या योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर संघात जान निर्माण झाली. ताण पडूनही या संघाने प्रथमच बाद फेरी गाठून एतिहासिक कामगिरी केली.

मोक्‍याच्या टप्यात मात्र मिस्लाव कोमोर्स्की, बार्थोलोम्यू ओगबेचे, रॉलीन बोर्जेस, फेडेरीको गॅलेगो अशा खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यामुळे नॉर्थइस्टची पिछेहाट झाली. आता पुढील मोसमाच्या तयारीसाठी वेळ मिळणार असल्यामुळे यंदाच्या सकारात्मक कामगिरीनंतर आणखी मोठ्या यशाचे स्वप्न नॉर्थइस्ट पाहू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)