हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : भरपाई वेळेत नॉर्थईस्टचा ब्लास्टर्सला झटका

गुवाहाटी – हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात केरळा ब्सास्टर्सला सर्वाधिक निराशाजनक पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने भरपाई वेळेत दोन गोल करीत ब्लास्टर्सला 2-1 असा झटका दिला. बार्थोलोम्यू ओबगेचेने पेनल्टी सत्कारणी लावली, तर सुपर सब जुआन मॅस्कीया याने निर्णायक गोल करत नॉर्थईस्टच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडीयमवर मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. 73व्या मिनिटाला मॅटेज पॉप्लॅटनिक याने ब्लास्टर्सचे खाते उघडले. निर्धारीत वेळेपर्यंत ही आघाडी कायम होती. भरपाई वेळेत मात्र संदेश झिंगन याने मॅस्कीया याला पाठीमागून धक्का देत पाडले. त्यामुळे पंच राहुल कुमार गुप्ता यांनी नॉर्थइस्टला पेनल्टी बहाल केली. त्यावर ओगबेचे याने अचूक लक्ष्य साधले. मग मॅस्कीया याने भरपाई वेळेतील सहाव्या मिनिटाला गोल करीत ब्लास्टर्सच्या जखमेवर मीठ चोळले.

पहिला प्रयत्न सहाव्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या मॅटेज पॉप्लॅटनिक याने केला, पण डावीकडून त्याने मारलेल्या फटक्‍यात पुरेशी ताकद नव्हती. त्यामुळे नॉर्थईस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने सहज बचाव केला. दोन मिनिटांनी नॉर्थईस्टने प्रयत्न केला. कॉर्नरवर ओगबेचे याचा फटका संदेश झिंगन याने ब्लॉक केला. त्यामुळे पुन्हा कॉर्नर मिळाला. त्यावर पुन्हा ब्लॉक झालेला चेंडू फेडेरिको गॅलेगो याच्याकडे गेला. त्याने मारलेला चेंडू एका खेळाडूच्या पायाला लागून वेग कमी झाला. त्यामुळ धीरज सिंग चेंडू सहज अडवू शकला.

दहाव्या मिनिटाला कॉर्नरवर ओगबेचे याने मारलेला चेंडू अगदी जवळ येऊनही धीरजचा अंदाज चुकला होता, पण त्याने कसेबसे सावरत बचाव केला. 14व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा चांगला प्रयत्न हुकला. हालीचरण नर्झारी याच्या क्रॉस शॉटमुळे सैमीनलेन डुंगलने हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती. 21व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा प्रयत्न हुकला. रेडिम ट्‌लांग याच्या पासवर मिस्लाव कोसोर्स्की याला हेडिंगच करता आले नाही. 29व्या मिनिटाला हालीचरणने याच्या पासवर मॅटेजने हेडिंग केलेला चेंडू मैदानाबाहेर गेला.

37व्या मिनिटाला ब्लास्टर्सने अप्रतिम प्रयत्न केला. निकोला क्रॅमरेविच याचा फटका उजवीकडून हालीचरणकडे गेला. त्याने आगेकूच करीत बॉक्‍समध्ये प्रवेश केला, पण जास्त ताकद लावून फटका मारल्यामुळे त्याचा पहिला प्रयत्न फोल ठरला. पवनने पुढे सरसावत चेंडू थोपविला. रिबाऊंडवर पुन्हा संधी मिळताच हालीचरणने फटका मारला, पण चेंडू गोलपोस्टला लागला. हा चेंडू डुंगलकडे गेला. त्याने फटका मारला, पण तो स्वैर होता.

नॉर्थईस्टने सात सामन्यांत चौथा विजय मिळविला असून दोन बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. त्यांनी पाचवरून दोन क्रमांक प्रगती करीत तिसरे स्थान गाठले. त्यांनी मुंबई सिटी एफसी (13) व जमशेदपूर एफसी (11) यांना मागे टाकले. एफसी गोवा व बेंगळुरू एफसी यांचे प्रत्येकी 16 गुण आहेत. ब्लास्टर्सला आठ सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण व सातवा क्रमांक कायम राहिला. सलामीला एटीकेला हरविल्यापासून ब्लास्टर्सची विजयाची प्रतिक्षा कायम आहे.

निकाल :

नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : 2 (बार्थोलोम्यू ओगबेचे 90+3-पेनल्टी, जुआन मॅस्कीया 90+6)
विजयी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स : 1 (मॅटेज पॉप्लॅटनिक 73)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)