इसिसच्या तामीळनाडूतील म्होरक्‍याला एनआयएकडून अटक 

नवी दिल्ली  – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या तामीळनाडूतील म्होरक्‍याला बुधवारी अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापासत्रानंतर ती कारवाई केली. मोहम्मद अझरूद्दीन असे अटक झालेल्या म्होरक्‍याचे नाव आहे. तामीळनाडूच्या कोईमतूरमध्ये इसिसकडे आकर्षित झालेला गट हातपाय परसवत असल्याची माहिती एनआयएला काही दिवसांपूर्वी मिळाली. त्यामुळे संबंधित गट एनआयएच्या रडारवर आला. एनआयएने पुढील कारवाई करताना कोईमतूरमधील सात ठिकाणी छापे टाकले. त्या छापासत्रावेळी 14 मोबाईल फोन, 29 सिम कार्ड, 10 पेन ड्राईव्ह, 3 लॅपटॉप आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर 32 वर्षीय अझरूद्दीनला अटक करण्यात आली.

तो सोशल मीडियाचा वापर करून इसिसमध्ये तरूणांची भरती करण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याच्या गटाचा दक्षिण भारतात आणि विशेषत: तामीळनाडू, केरळ या राज्यांत दहशतवादी हल्ले घडवण्याचा डाव असल्याची माहिती समोर आली. एप्रिलमध्ये इसिसने श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवले. ते बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांपैकी एक असणाऱ्याशी अझरूद्दीनने फेसबुकवर मैत्री केली होती, असेही निष्पन्न झाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)