म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-१)

सध्या टीव्हीवर, वर्तमानपत्रातून तसेच शहरांमध्ये विविध भागात ‘म्युच्युअल फंड सही है’ सोबतच ‘डायरेक्ट’ म्हणजेच थेट गुंतवणूक करा अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सिक्युरिटी अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जानेवारी २०१३ पासून प्रत्येक म्युच्युअल फंड कंपन्यांना ‘डायरेक्ट’ म्हणजेच गुंतवणुकीचा थेट पर्याय उपलब्ध करण्यास सांगितले आहे. हा पर्याय म्हणजे गुंतवणूकदार थेट म्युच्युअल फंड कंपनीकडून कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. यामुळे या योजनेवर दिले जाणारे एजंट कमिशन गुंतवणुकदारांस द्यावे लागत नाही.

प्रथमदर्शनी हा पर्याय गुंतवणुकदारास आकर्षक वाटू शकतो कारण त्याच्या गुंतवणुकीवर कमी खर्च आकारला जाणार आहे. साहजिकच थोडा जादा नफा होणार आहे का, असा समज होऊ शकतो. प्रत्येक गुंतवणूकादराच्या गुंतवणूक ज्ञानाप्रमाणे तो गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतो. आज भारतीय गुंतवणूक क्षेत्रात साधारणतः ४४ म्युच्युअल फंडांच्या सुमारे २००० पेक्षा जास्त योजना कार्यरत आहेत. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या स्वतःच्या गुंतवणूक गरजा, उद्दीष्टे व जोखिम घेण्याच्या क्षमतेप्रमाणेच गुंतवणूक योजनांची निवड करणे गरजेचे असते. गुंतवणुकीसाठीचा उपलब्ध असलेला कालावधी हा देखील गुंतवणूक पर्याय निवडताना लक्षात घेणे आवश्यक आहे. जर गुंतवणुकदाराला ४४ म्युच्युअल फंडांच्या २००० पेक्षा जास्त योजनांपैकी नेमकी योजना निवडण्याचे संपूर्ण ज्ञान असेल तरच डायरेक्ट अथवा थेट गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-२)

म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडांपासून सेक्टर फंडापर्यंत अशा विविध योजनांमध्ये वेगेवेगळी जोखिम निश्चितच असते. परंतु गुंतवुणुकदाराने सदर जोखिमीकडे दुर्लक्ष केल्यास गुंतवणुकीमध्ये मोठे नुकसान भविष्यात होऊ शकते. प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या योजनेचे प्रमुख डॉक्युमेंटस् जसे की, ऑफर डॉक्युमेंट, स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (एसआयडी), स्टेटमेंट ऑफ अडिशनल इन्फॉर्मेशन (एसएआय) आणि की इन्फॉर्मेशन मेमोरेन्डम (केआयएम) याचे सखोल वाचन करणे आवश्यक आहे. शंभर टक्के गुंतवणूदार याविषयी अनभिज्ञ असतात.`म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क, रिड ऑफ डॉक्युमेंट केअरफुली‘ अशी जाहिरात प्रत्येकवेळी सेबी व म्युच्युअल फंडांच्या कंपन्या करत असतात. परंतु आज साधारणतः २५ कोटी खाती असणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांमधील अनेक योजनांमधील गुंतवणूकदार वर सांगितलेल्या सूचनेचा खरोखरच विचार करतात का? त्यानुसार सर्व गुंतवणूक संबंधित डॉक्युमेंटस् वाचली जातात का? याबाबत गांभीर्याने विचार केला जावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)