माझा भाजपचा प्रवेश योग्य की अयोग्य?

मदनदादांनी विचारलाय कार्यकर्त्यांना डिजीटल प्रश्‍न

मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. कार्यकर्त्यांनी मदन यांनी भाजपमध्ये जावे असाच सूर धरला. त्यानंतर किसन वीर कारखान्याच्या तिसऱ्या डिस्टीलरीच्या उद्घाटनाचे निमित्त साधत मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित कार्यक्रमाला यावे, असा भोसले यांचा आग्रह होता. त्यानुसार किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते किसन वीर कारखान्याच्या तिसऱ्या डिस्टीलरीचे पूजन झाले.

दादांनी भाजप प्रवेश केला खरा पण दोन दशके कॉंग्रेसवासी असणाऱ्या मदनदादांचे भाजप पुनर्वसन नक्कीच सोपे नव्हते. आता हा निर्णय नक्की किती पथ्यावर पडला हे तपासण्यासाठी मदनदादांनी चक्क फेसबुकचा आधार घेतला. माझा भाजप प्रवेश योग्य की अयोग्य असा थेट प्रश्‍न फेसबुक पेजवर झळकला असून त्याला होय किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. दादांच्या या प्रश्‍नाला तब्बल सहाशे लाईक्‍स आणि शंभरच्या वर प्रतिक्रिया आल्या. बऱ्याच प्रतिक्रिया या शुभेच्छा आणि दादा तुम आगे बढो अशाच स्वरूपाच्या होत्या. काही प्रतिक्रिया नी दादांच्या निर्णयाला पसंती दर्शवत त्यांना राजकीय पाठिंबा दिला आहे. दादांनाही या प्रतिक्रियामुळे नक्कीच समाधान मिळाल्याची चर्चा आहे.

मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात वातावरण कमालीचे तापले आहे. एकेकाळी सातारा जिल्हा कॉंग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या भोसले यांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसवर मोठा वज्राघात होणार आहे. अगोदरच गटा-तटात विखुरलेली व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदीपुढे हैराण झालेली राष्ट्रीय कॉंग्रेस भोसले यांच्या भाजपमध्ये जाण्याने आणखी कमजोर होण्याची शक्‍यता आहे. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेही बदलणार असून भाजपला वक्तृत्वात पारंगत असलेला, जनाधार असलेला व कामाचा प्रचंड डोंगर उभा केलेला वजनदार नेता मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)